त्रिमूर्ती अन् वीट
सिव्हिल इंजिनिअरिंग करीत असताना त्यांची गट्टी चांगलीच जमली. अंतिम वर्षात करावयाच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने त्यांनी भन्नाट संकल्पना मांडली. प्रत्यक्षात आणणे तसे अवघड पण त्यांनी तेही साध्य केले. म्हणूनच आज त्यांचे हे अनोखे आणि पर्यावरणपूरक स्टार्टअप सध्या विशेष चर्चेचे बनले आहे. संयुक्त राष्ट्र आणि भारत सरकारनेही त्याची दखल घेतली आहे.
- भावेश ब्राह्मणकर
(लेखक पर्यावरण आणि सामरिकशास्त्र अभ्यासक आहेत)
रुपम चौधरी, मौसुम तालुकदार आणि डेव्हिड गोगोई हे तिघे आसाम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होते. सातव्या सेमिस्टरला त्यांना प्रोजेक्ट सक्तीचा होता. सर्वसाधारणपणे इकडून तिकडून माहिती मिळवून ‘पाटी टाकणारा’ प्रोजेक्ट त्यांना करायचा नव्हता. त्यातच रुपम हा पर्यावरणपूरक अशा प्रकल्पाच्या शोधात होता. आज सर्व जगालाच जो प्रश्न भेडसावतो आहे त्यावरच आपण उत्तर शोधले तर आपल्या प्रोजेक्टला मरण नाही आणि पर्यावरणाचे संवर्धनही होईल. अखेर त्याने कचऱ्यावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर त्याचे सर्वाधिक लक्ष प्लास्टिककडे गेले. प्लास्टिक ही मोठी डोकेदुखी आहे. ती सोडवली तर नक्कीच चांगले होईल, असे त्याने निश्चित केले. मौसुम आणि रुपम दोघेही कामाला लागले. काय करता येईल, कसे करता येईल या हेतूने त्यांचे संशोधन सुरू झाले. प्लास्टिक वापरुन वीटा तयार केल्या आणि त्या बांधकामात वापरल्या तर अशी कल्पना त्यांना सुचली. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरु केले. पण, प्लास्टिक कसे वापरायचे यादृष्टीने त्यांनी काही प्रयत्न केले. प्लास्टिक जाळून पाहिले तर त्यातून मोठेच वायू प्रदूषण होत होते. मग, प्लास्टिकचे तुकडे करायचे ठरवले. पण ते वीटेत बसत नव्हते. शिवाय प्लास्टिकचे तुकडे कसे करायचे हाही प्रश्नच होता. अखेर प्लास्टिकची पावडर करण्याचे त्यांनी निश्चित केले. त्यात यश आले. हाच प्रोजेक्ट त्यांनी अंतिम वर्षात सादर केला.
इंजिनीअरिंगची पदवी मिळाली पण पुढे काय, हा प्रश्न होताच. स्वतःचेच स्टार्टअप सुरू करावे आणि आपल्याच प्रोजेक्टला गती द्यावी, या उद्देशाने त्यांनी हालचाली केल्या. पण, अनेक अडचणी होत्या. जागा, पैसे, भांडवल असे एक ना अनेक. गुंतवणूकदार हवा शिवाय उत्पादनही दर्जेदार हवे. हिंमत केली आणि त्यांनी सुरुवात करायचे ठरवले. त्याचवेळी डेव्हिड मदतीला आला. तिघेही एकत्र बसले आणि त्यांनी आराखडा बनवला. डेव्हिडचे कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांशी (अल्युमनस) चांगल्या ओळखी होत्या. त्यांच्या गाठीभेटी यांनी घेतल्या. औष्णिक विद्युत प्रकल्पांमधून बाहेर पडणारी राख (फ्लाय अश) आणि प्लास्टिकची पावडर तयार करण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी करुन दाखविला. त्यामुळेच माजी विद्यार्थ्यांनी या स्टार्टअप मध्ये भांडवल देण्याची तयारी दर्शविली. झेरुंड ब्रिक्स हे स्टार्टअप आणि कारखाना सुरू झाला. पण….
राख आणि प्लास्टिकपासून बनवलेल्या वीटेचे मार्केटिंग त्यांनी सुरु केले. पण, प्रस्थापित उद्योगांनी त्यांना थोडाही धक्का लागू दिला नाही. यांनीही संयम सोडला नाही. बाजारात लाल वीट ही ९ ते १० रुपयांना मिळते. तर, झेरुंड ब्रीक्स ४२ रुपयांना. सहाजिकच फारसा प्रतिसाद नव्हता. पण, या तिघांनीही कौशल्यपूर्ण आणि प्रभावी मार्केटिंग सुरू केले. राखेची वीट ५०० मिमी लांब, २०० मिमी उंची आणि १०० मिमी जाडीची होती. तिचे वजन ८ किलो होते. लाल वीट जिथे सहा लागायच्या तिथे राखेची वीट एकच लागते. त्यामुळे लाल वीटेसाठी ५४ ते ६० रुपये खर्च यायचा. तर राखेच्या वीटेला अवघे ४२ ते ४५ रुपये. शिवाय ही वीट पर्यावरणपूरक, हल्या वजनाची, अग्निरोधक. हेच मुद्दे बांधकाम व्यावसायिकांना त्यांनी समजून सांगतिले. ऑर्डर मिळू लागली पण मागणी ऐवढ्ये उत्पादनाची क्षमता नव्हती. कारण, मोठ्या बांधकाम प्रकल्पांना लागणाऱ्या हजारो वीटा तयार करण्याच्या सुविधा त्यांच्याकडे नव्हत्या. गुवाहाटी जवळील आझरा येथे २१ हजार ६०० चौरस फुटावर त्यांनी कारखाना सुरू केला. दिवसाकाठी २०० ते २५० वीटांचे उत्पादन होऊ लागले. यातूनच या स्टार्टअपने वेग घेतला.
रोकड टंचाईचाही सामना त्यांना करावा लागला. कारण बाजारात वीटा उधारीने देण्याचा प्रघात होता. यांच्याकडे एवढे भांडवल नव्हते. तर रोखीने वीटा घेण्यास कुणीही तयार नव्हते. ऑर्डर मिळत होती पण पैशाची अडचण होतीच. जोपर्यंत आम्हालाही पैसे मिळत नाही तोपर्यंत आमचे खेळते भांडवल तयार होणार नव्हते. स्पर्धक मात्र ग्राहकांना आणखीनच उत्तेजित करत होते. अखेर वाढते ग्राहक आणि गुंतवणूकदारांमुळे आम्ही दोन महिने उधारीने पैसे घेऊ लागलो. यातूनच हळूहळू आमचा उद्योग सेट झाल्याचे रुपम सांगतो.
राखेचे योग्य व्यवस्थापन आणि प्लास्टिकची योग्य विल्हेवाट या जोरावर झेरुंड ब्रीक्सला मागणी वाढू लागली. आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे येथील घरांची हानी होते. मात्र, लाल वीटांपेक्षा राखेच्या या वीटा १५ टक्के कमी पाणी शोषून घेतात. म्हणून बांधकाम व्यावसायिक पसंती देऊ लागले. कोक्राझार येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातून राख मिळू लागली. ७० टक्के प्लास्टिक व कचरा वापरुन ही वीट तयार होऊ लागली. सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू झालेल्या या स्टार्टअपने अखेर विस्ताराच्या दिशेने पावले टाकली. आतापर्यंत त्यांचे तब्बल १ हजाराहून अधिक ग्राहक झाले आहेत. तसेच, त्यांनी तब्बल अडीच लाख वीटाही विकल्या आहेत. बोनगायगाव येथेही त्यांनी कारखाना सुरू केला आहे. वर्षाकाठी १० ते १२ लाख वीटा निर्माण करण्याची क्षमता त्यांनी तयार केली आहे.
भारत आणि संयुक्त राष्ट्र निधीने घेतलेल्या नाविन्यपूर्ण स्टार्टअपच्या स्पर्धेत झेरुंडने घवघवीत यश मिळविले. त्यातून मिळाल्या निधीतून त्यांनी या स्टार्टअपला अधिक बळ दिले. तर, कोलकात्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या एका उपक्रमाअंतर्गत या स्टार्टअपला संशोधन व विकासासाठी निधी मिळाला. यातून या स्टार्टअपला आणखी पुढे जाण्यास मदत झाली. २०२२ पर्यंत आणखी ५ उत्पादन कारखाने सुरू करण्याचे या तिघांचे ध्येय आहे. तसेच पर्यावरणपूरक पेव्हर ब्ल़ॉक आणि टाईल्स ची निर्मिती करण्याचेही त्यांनी निश्चित केले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होतो हे पाहून दुःख करणे आणि त्याविषयी वाईट वाटून काहीच होणार नाही. आपण प्रत्येकाने छोटे छोटे प्रयत्न केले तर पर्यावरणाची काळजी सहज घेतली जाईल. हे स्टार्टअप सुरू करताना असंख्य अडचणी होत्या. पण त्यादूर झाल्या कारण आम्ही प्रयत्न सुरू ठेवण्याचा निश्चय केला. अडचणींवर मार्ग शोधले. आज या संशोधनाचे पेटंटही त्यांना मिळाले आहे. केंद्र सरकार तसेच आसाम सरकार सुद्धा या तिघांकडे मोठ्या आशेने पाहत आहे. सर्वसधारण इंजिनीअरिंग करणाऱ्यांसमोर या तिघांनी मोठा आदर्श निर्माण केला आहे. जे करायचे ते मनापासून करा. आज शेकडो व्यक्तींना त्यांच्या स्टार्टअप मुळे रोजगार मिळाला आहे. तसेच, लाल वीटांपासून होणारे प्रदूषण रोखण्यातही त्यांना यश येत आहे. ईशान्येत सुरू झालेल्या या स्टार्टअपचा बोलबाला आता संपूर्ण भारतात आहे. इंजिनीअरिंगसह अन्य विद्यार्थ्यांनी या तिघांपासून प्रेरणा घेत स्टार्टअप तयार करायला हरकत नाही.