कन्फ्यूज खडसे
भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. यापूर्वीही त्यांच्याबद्दल अशा चर्चा होत होत्या. पण, त्यांनी भाजपला रामराम केला नाही. आताही ते करतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. बिनधास्त बोलणारे खडसे अशा चर्चेवर हातचे राखून बोलतात. त्यामुळे ते कन्फ्यूज तर नाही ना? असा प्रश्नही अनेकांना पडतो.
- गौतम संचेती
(लेखक इंडिया दर्पण लाईव्हचे संपादक आहेत)
एकनाथ खडसे हे भाजपमधील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. भाजपची राज्यात सत्ता असताना त्यांच्याकडे मोठी जबाबदारी होती. पण, मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांचे वर्चस्व कमी करण्याची अनेक कारस्थाने पक्षातंर्गतच झाली. त्याला कधी त्यांनी आपल्या स्टाईलने उत्तरे दिली. तर काहीवेळा त्यांनी समंजसपणा दाखवत वादावर पडदा सुद्धा टाकला. आताही त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत या जुन्या वादाला फोडणी दिली आहे. त्यामुळे कोरोना काळात थंडावलेले राजकारण पुन्हा तापले व खडसे पुन्हा चर्चेत आले.
खरं तर अशा चर्चा घडवून आणणे व त्यातून चर्चेत राहणे हे राजकारणातले तंत्र आहे. त्यामागे स्वपक्षावर दबाव आणणे व आपले महत्त्व वाढवणे हा उद्देश असतो. खडसे यांनी नेमके हेच तंत्र वापरले असल्याचे दोन-तीन घटनेनंतर तरी समोर आले आहे. खडसे अशा चर्चा व्हाव्यात यासाठी जुना मुद्दा उपस्थितीत करतात. त्यानंतर चर्चा सुरु झाली की, ते त्यावर थेट बोलत नाहीत व निर्णयही घेत नाहीत. त्यामुळे ते कन्फ्यूज असल्याचे जाणवते. या कन्फ्यूज राहण्यामागे अनेक कारणेही तशीच आहेत. पण, आताची परिस्थिती थोडी वेगळी असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. थेट हल्लाबोल करत आपल्यावर झालेल्या अन्यायाला खडसे यांनी वाचा फोडली आहे. त्यामुळे ते पक्षांतर करु शकतात, असे त्यांना वाटते.
कोणताही नेता राज्यात किती लोकप्रिय असला तरी तो अगोदर आपल्या मतदारसंघाचा व जिल्ह्याचा विचार करतो. आपण घेतलेल्या निर्णयाचा आपल्या भागावर काय परिणाम होईल, याचा विचार करतो. असाच विचार खडसे करत असावेत. त्यामुळे त्यांचे कन्फ्यूजन वाढत चालल्याचे बोलले जाते. भाजपची सत्ता आल्यानंतर एक हाती जिल्ह्यात त्यांचे वर्चस्व होते. पण, मंत्रिपद गेल्यानंतर ते कमी कमी होत गेले. खडसेंच्या राजीनाम्यानंतर गिरीश महाजन यांनी नंतरच्या काळात जिल्ह्यात चांगली पकड बसवली. याचा परिणाम खडसे यांच्या वर्चस्वाला झाला. त्यानंतर त्यांना मुक्ताईनगर मतदारसंघात उमेदवारी नाकारण्यात आली. पण, त्यावेळेस त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली. पण, त्या पराभूत झाल्या. खरं तर येथूनच खडसे नाराज झाले. त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादीत ते जाणार असल्याची चर्चा रंगली. पण, ती चर्चाच ठरली.
एकीकडे असे वर्चस्व कमी झाल्यानंतर दुस-या पक्षात जाऊन पुन्हा वर्चस्व राखता येईल का? असा प्रश्नही खडसेंना पडला असावा. आता त्यांच्या घरात सून खासदार आहे. मुलगी जिल्हा बँकेची चेअरमन तर पत्नी दूध संघाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे पक्षांतर केल्यानंतर यातील दोन पदांना फारसा फरक पडणार नाही. पण, सूनेला खासदारकी सोडावी लागेल. त्यामुळे पोटनिवडणुकीत ही जागा राखता येईल का? यावर घोडं अडले असावे, असे बोलले जात आहे. पण, खडसे असा विचार करत असतील, असे वाटत नाही. कारण, ते संघर्ष करणारे नेते आहेत. त्यामुळे ते पुन्हा वर्चस्व स्थापन करेल, असे त्यांच्या समर्थकांना वाटते.
राज्यात शिवसेना – भाजपची सत्ता आल्यानंतर गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे हे दोन दिग्गज नेते होते. त्यावेळेस नितीन गडकरी मंत्री असतांना त्यांचे नाव पहिल्या यादीत नव्हते. देवेंद्र फडणवीस यांची तेव्हा राज्याच्या राजकारणात एन्ट्री सुध्दा झाली नव्हती. त्यामुळेच खडसे यांनी काल आलेले लोक आम्हाला शिकवतात असे सांगणे सुद्धा वास्तव आहे.
खडसे यांनी पक्षांतर केले तर त्याचा त्यांना काय फायदा होईल, यापेक्षा भाजपला किती फटका बसेल हे महत्त्वाचे आहे. खडसे अभ्यासू तर आहेतच. पण, ते तळागाळातले नेते आहेत. त्यांचे समर्थक राज्यभर आहेत. त्यामुळे त्याचा फटका भाजपला बसू शकतो. खडसे यांच्याकडे कोणतेही पद नसतांना त्यांची राज्यभर चर्चा होत आहे. त्यातूनच त्यांचे महत्त्व अधोरेखित होते. खडसे यांना राष्ट्रवादीच नाही तर शिवसेना व काँग्रेस सुद्धा आपल्या पक्षात घेण्यास इच्छुक आहे. पण, खडसे यांची राष्ट्रवादीची जवळीक सर्वांना माहित आहे. विरोधी पक्ष नेते असताना सुद्धा आपल्या मतदारसंघात पालकमंत्र्यापेक्षा जास्त कामे त्यांनी खेचून आणली. त्यामुळे त्यांनी पक्षांतर केले तर ते राष्ट्रवादीतच जातील.
खरं तर खडसे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते व ते झालेही असते. पण, या पदासाठी त्यांचे आजारपण नेहमी आडवे आले. या आजारपणामुळे त्यांना अनेक संधीवर पाणी सोडावे लागले. नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा ती संधी खडसे यांना होती. पण, त्यांनी आजारपणामुळे ती नाकारली व गडकरी प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात गेले. देवेंद्र फडणवीस यांना मिळालेले प्रदेशाध्यक्षपद हे सुध्दा खडसे यांना मिळणार होते. पण, त्यांनी नकार दिला व फडणवीस प्रदेशाध्यक्ष व नंतर मुख्यमंत्री झाले. खडसे जर फडणवीस यांच्याऐवजी प्रदेशाध्यक्ष असते तर त्यांना मुख्यमंत्रीपदही मिळाले असते. पण, त्यांनी संधी नाकारली व त्यातून गडकरी व फडणवीस यांना पदे मिळत गेली.
एकूणच हा खडसेंचा प्रवास अनेकांना कन्फ्यूज करतो. ते कधी कधी योग्य वेळी निर्णय घेत नाहीत. त्यामुळे त्यांना त्याचे परिणामही भोगावे लागतात. पण, आता खडसे यांची स्थिती थोडी वेगळी आहे. ते निर्णय घेण्याच्या स्थितीत आले आहेत. त्यांच्यासाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्यावर काय निर्णय झाला हे बाहेर आले नाही. पण, काही तरी घडतंय हे मात्र नक्की. खडसे यांनी घड्याळ हातात बांधले तर त्याची टीक टीक दिल्लीतही वाजेल व राज्यात भाजपचे काटे उलटे फिरतील. जर पक्षांतर नाही केले तर भाजपला खडसेंची खडखड सहन करावी लागेल. त्यानंतर खडसे ऐवजी भाजपच कन्फ्यूज दिसेल, हे मात्र नक्की.