‘वंचितांच्या मुक्या वेदनेचा तांडा आपल्या कवितांच्या समर्थ खांद्यांवर घेऊन निघालेला कवी’ : प्रा. डॉ. वीरा राठोड
- प्रा. लक्ष्मण महाडिक
(लेखक ज्येष्ठ कवी आहेत)
भारताला स्वतंत्र्य मिळालं. भारतीय स्वातंत्र्याने लोकशाही मूल्ये दिली. त्यानुसार नवी समताधिष्ठित समाजरचना अस्तित्वात येणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. कारण भारतीय समाजमनावर जाती, धर्मव्यवस्थेचा प्रचंड पगडा असल्याने स्वातंत्र्याची मूल्ये आपणास मिळूनही आपण ती स्वीकारू शकलो नाही. त्यामुळे दलितांना गावकुसाबाहेर, तर भटक्यांना शेतशिवारात या व्यवस्थेनेच लोटले होते. दलितांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने लोकशाही मूल्यांचा स्वीकार करून व्यवस्थेकडून आपले हक्क हिसकावून घेतले. याउलट भटका-विमुक्त समाज शतकानुशतकं शेतशिवार, जंगलातून भटकत जीवन जगत राहिला.हक्क मिळवण्यापासून दूर राहिला.संघटीत झाला नाही. गावात घर नाही आणि शिवारात शेत नाही. अशी अमानुष पशुवत अवस्था भटक्या-विमुक्तांच्या वाट्याला आली आहे. ते व्यवस्थचे घटक असूनही व्यवस्थेत मात्र सहभागी होऊ दिले नाही.त्यामुळे स्वतंत्र्य मिळूनही सत्तर वर्षांत भटक्या-विमुक्तांच्या हाती काहीच लागले नाही. ५२ सेटलमेंट जेलमधील इंग्रज सरकारने दिलेली जमीन ही भटक्यांची धनदांडग्या व राजकारणी लोकांनी बळकावली आहे. तर लोकसंख्येच्या प्रमाणात २० टक्के इतकी लोकसंख्या असतानाही भटक्या-विमुक्तांना जाती-जमातीनुसार आरक्षणात प्रतिनिधित्व दिले नाही. अशा भटक्या-विमुक्तांचं आयुष्य जगणारा मराठवाडयातला कवी प्रा.डॉ.वीरा राठोड आजच्या कवी आणि कविता सदरात सहभागी होत आहे.
कवी वीरा राठोड हे भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त कवी आहेत. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सावळी तांडयावर दि.६ फेब्रुवारी १९८० रोजी कवी वीरा रामराव राठोड यांचा जन्म अशिक्षित लमाण-बंजारा कुटुंबात झाला. आरंभीचे शिक्षण आश्रम शाळेमध्ये झाले. मात्र महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी औरंगाबाद येथे पूर्ण केले. औरंगाबाद मधील वास्तव्यात प्रा.डॉ.शत्रुघ्न फड, प्रा.डॉ.पी. विठ्ठल यांनी त्यांच्यातल्या कवीचा शोध घेतला. लिहिण्याची प्रेरणा बनले.त्यांच्या मनाची मशागत केली. असे कवी वीरा राठोड मोठ्या अभिमानाने सांगतात.जसजसे जीवन कळत गेले,जीवनातील दाहाकेतेची होरपळ वाढत गेली.सकल समांतर सोबत चालत आलेलं वास्तव अंगाला भिनू लागलं.मनातील अस्वस्थता,होरपळ यांची कालवाकालव वाढत गेली. काळजातले हुंकार डोळ्यातल्या आसवातून ओघळता ओघळता शब्दांचे रूप घेते झाले. विराण माळरानासारखं वाट्याला आलेलं दुष्काळी आयुष्य.ज्ञानाचा किरण न पोहोचलेला तांडा. द-या खो-यातील डोंगररांगांच्या आडोशाला गेलेलं बालपण. आठवतो तेंव्हापासून दारूच्या व्यसनात आकंठ बुडालेला बाप.जन्मदात्या आईनं (याडीनं) मरणापलीकडचं मोठ्या हिमतीनं भोगलेलं आयुष्य. कवीचा पाठीवर दोन भावंडं. त्यात विरा मोठा. तो आठवीत शिकत आहे. मॅट्रीक झाला म्हणजे नोकरीला लागेल. तिघांना शिकवणं अशक्य. म्हणून लहान भावाची शाळा बंद करण्याचा आई आणि आजीनं अनेक उन्हाळ्या पावसाळ्यातून आलेल्या जन्मजात अनुभवाच्या शहाणपणानं घेतलेला निर्णय. दोघांचे आयुष्य घडवताना लहानग्याच्या आयुष्याची माती झाली. दोघांच्या शिक्षणासाठी एक बळी गेला. तेव्हा तांड्यातल्या लोकांनी नको नको ते बोल लावले. नातलगांकडे मदतीसाठी हात पसरले.त्यांनी नेहमीप्रमाणे हात वर केले .हे सगळं दु:खं भरलं आयुष्य कवीनं हासायच्या, बागडायच्या वयात अनुभवलं. जगण्याच्या यातनातून त्याही वयात आतड्याला पीळ पडत गेला. त्या वेदनेच्या पिळातून कवी लिहिता झाला. म्हणून वीरा राठोड यांची कविता म्हणजे नुसतीच वेदनेची कळ नाही तर आतड्याचा पीळ आहे. दु:खं भरल्या आयुष्याचं गाणं कोण ऐकणार.अशावेळी कविता जवळची वाटली.अपघाताने कवितेच्या वाटेवरचा प्रवास सुरु झाला. कवितेनं जगणं सोपं केलं.त्यांनी आपल्या गोरमाटी बंजारा बोलीत कविता लिहिली.ती जवळची बोलीभाषा होती. खरं तर भाषा म्हणजे विचार,भावना,अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते.भाषा हे संवादाचे एक प्रभावी माध्यम असते.
कवी वीरा राठोड यांनी मराठी विषयात एम. ए ; बी.एड ; एम.एड; पी. एच.डी; नेट; बी.लीप; आदी पदव्या प्राप्त केल्या आहे . पी.एच.डीच्या संशोधनासाठी ‘भटक्या विमुक्तांचे साहित्य: विशेष संदर्भ म्हणून आत्माराम मनीराम राठोड यांचे साहित्य ’ हा विषय घेतला होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या कुमारभारती या प्रथम भाषा अभ्यासक्रमासाठी ‘मनक्या पेरेन लागा’ ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. ‘हस्तक्षेप’ हा त्यांचा सामाजिक विषयावरील विविध लेखांचा संग्रह प्रकाशित आहे. ‘सेनं सायी वेस’ व ‘पिढी घडायेरी वाते’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहे.आजपर्यंत त्यांना विविध सन्मानाने सन्मानित केलेले आहे.‘सेनं सायी वेस’ या पहिल्या काव्यसंग्रहाला दिल्ली येथील भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०१५ प्राप्त झाला. मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमावती देशमुख काव्य पुरस्कार . औरंगाबाद येथील मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार. इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिराचा कवयित्री इंदिरा संत राज्य पुरस्कार .संगमनेर येथील शाहीर अनंत फंदी प्रतिष्ठानचा शाहीर अनंत फंदी राज्य पुरस्कार .मुंबईचा दया पवार साहित्य पुरस्कार. राजगुरुनगरचा पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्कार, अंबेजोगाईचा यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार . सांगलीचा स्वर्गीय प्रभाकर चव्हाण साहित्य पुरस्कार. शिवूर वैजापूरचा शिव शंभू साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचा उत्कृष्ट काव्य लेखनाचा राज्य पुरस्कार .मराठी जनसाहित्य परिषद अमरावतीचा अक्षर वैदर्भी उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार .एम. सी. एन. टी. विशेष मराठवाडा युथ आयकॉन पुरस्कार. तसेच दिव्य मराठी प्राउड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित केले आहेत. ‘बंद दरवाजा’ या मासिकासाठी परिवर्तन सदरात त्यांनी स्तंभलेखन केले आहे. दैनिक दिव्य मराठी ,दैनिक महाराष्ट्र टाइम्स, दैनिक सकाळमध्ये त्यांनी स्तंभलेखन केले आहेत.मुंबई विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठात त्यांच्या कवितांचा विविध अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.प्रा.डॉ. वीरा राठोड हे महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत. त्यांना भारतीय साहित्य अकादमी नवी दिल्लीची साहित्य अकादमी प्रवास शिष्यवृत्ती लाभली आहे. त्यांच्या कविता हिंदी, इंग्रजी, बंगाली भाषेत प्रकाशित झाल्या आहेत. ‘सेनं सायी वेस’ हा कवितासंग्रह इंग्रजीत अनुवादित झाला आहे. ‘केसुला’ या बंजारा बोलीभाषेला वाहिलेल्या अंकाचे ते संपादक म्हणून काम पाहत आहे.
कवी वीरा राठोड यांच्या जगण्याचा प्रवास हा संघर्षाने भरलेला आहे. अगणित समस्यांशी सामना करतच त्यांना सिध्द व्हावे लागले. संघर्षाशिवाय जीवन नाही.संघर्ष हा जीवनाचा जेव्हा ध्यास होतो, तेव्हाच ख-या अर्थाने ध्येय साध्य होत असतं. संघर्षाने भरलेल्या वाटेवरून चालण्यासाठी वेगवेगळ्या प्रेरणांचीही गरज असते. जगण्यासाठीचे इंधन असावे लागते. हे सारं इंधन त्यांना साहित्यातून, पुस्तकातून म्हणजेच वाचनातून मिळत गेले. तशी तर निसर्गाने सृष्टीतल्या प्रत्येक घटकात लढण्याची क्षमता निर्माण केलेली आहे. फक्त त्या घटकांना त्याची जाणिव व्हावी लागते. ती जाणीव झाल्यास प्रत्येकजण लढायला आपोआपच तयार होत असतो. काहींमध्ये मात्र जगण्याविषयी, लढण्याविषयी, संवेदना निर्माण करावी लागते . त्याला प्रेरित करणारी प्रेरणा हवी असते. अशी प्रेरणा राठोड यांना वाचनातून मिळत गेली. त्यातूनच त्यांची कविता वास्तवाचा खडक भेदून लाव्हा होऊन बरसू लागते. व्यवस्थेवर तुटून पडते.वीरा राठोडांची कविता म्हणजे त्यांच्या संवेदनेचा हुंकार अन् वेदनेचा ओंकार आहे. त्यांच्या जगण्यातल्या भळभळत्या जखमांच्या वेदना कवितेतून आग ओकत येतात.त्यांच्या मनाचा प्रतिध्वनी त्यांच्या कवितेमधून ध्वनित होतो.जीवनाच्या वाटचालीत दुखावलेला स्वाभिमान, किंवा अभिमानाची झालेली गळचेपी,असत्याशी चाललेला सततचा संघर्ष, मनाच्या तळातलं द्वंद्व कवी शब्दांच्या चिमटीत पकडू पाहतो. बुद्धाच्या शान्ति आणि अहिंसेच्या मार्गाने जाऊ पाहतो.कवीला किड्या मुंग्यासारखं फिरणं किंवा अंत:करणाच्या मातीत वारूळ करणं पसंत नाही. म्हणून त्यांची कविता आयुष्याला चंदनासारखी गंधित करते. सामाजिक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तर शोधते. त्यांची कविता अस्वस्थ मनाला उभारी देते. सकारात्मक मार्गाने जावून विश्वकल्यानाच्या तसेच सामाजिक समतेच्या उभारणीत सहभाग नोंदवते.वीरा राठोड यांची कविता तिथले दारिद्र्,तिथली घुसमट, जगण्याचा आटापिटा, त्या जगाचा वेगळा वसूल, तिथले व्यवहार, तिथली भाषा, तिथल्या विविध भावसंवेदना, माणसांचं पोरकेपण असं सभोवतालचं सकलसमांतर सगळं वास्तव घेऊन येते.
कवीच्या प्रत्येक कवितेमागे त्याच्या अवघ्या जन्माची माती असते. उभ्या जन्माचं संचित असतं.अनुभव विश्वाची भ्रमंती असते.कवीची कविता ही जाणीव आणि वेदनेची अभिव्यक्ती ठरते. खरं तर कविता हा कवीचा आत्मसंवाद असतो.नुसतं खत,पाणी दिलं म्हणजे पिक येत नसतं, तर त्यासाठी सामर्थ्यवान,कसदार बी असावं लागतं. थोडक्यात कविता ही फेस पावडरसारखी वरून लिंपायाची अथवा लावायची गोष्ट नसते, तर ती आई होऊन गर्भासारखी जपायची… अन् जोपासायची गोष्ट असते. कवी नेहमी त्याच्या स्वत:च्या भावविश्वातील जाणीवांना छीलत असतो. तो आपल्या वेदनांच्या, भावनांच्या स्पंदनांना शब्दांच्या स्वाधीन करतो. म्हणजेच तो कवितेतून अभिव्यक्त होत असतो. कवी वीरा राठोड यांची कविता वाचतांना वाचकाला अस्वस्थ करून सोडते. त्यांच्या कवितेत शब्दाशब्दात अंगार आहे. त्यांची कविता स्वत्वाची जाणीव करुन देते. तशीच ती सामाजिक प्रश्नांना हात घालते. जी कूस जन्म देते ती कधी वांझ राहूच शकत नाही.आपण सूर्यपुत्र असतांना आपण अंधाराचे पाईक का म्हणून जगायचे ? आपण वादळाचे वारसदार असतांना मृगजळात अडकलेल्या सावल्यांचा पाठलाग किती दिवस करायचा? असे नानाविध प्रश्न त्यांची कविता उपस्थित करते.
‘ पांथस्थानो चालू लागा मशाली घेऊन …. हाकारणा–या मुक्कामाकडे
अंधाराच्या गावागावातून उजेडाचे बेट उभे करीत जायचे आहे
जर सामनाच अंधाराशी असेल तर भीती कशाची …!
जर वेदनाच असतील सोबत तर दु:खं कशाचे ?
कुणी वादळ व्हा ..! कुणी लाटा व्हा..!
जिथे पोहोचणार नाही नजर त्या क्षितिजावर स्वप्नांची घरे न्या ..!’
या रूढी,परंपरा तसेच माणसा माणसातील भेदभावांची सामाजिक विषमता संपविण्यासाठी जिथून बंड क्षमविण्याची हाकाटी होते. तिच्या उगमस्थानावर त्यांची कविता हल्ला चढविण्याची भाषा करते. अंधाराच्या गावातून उजेडाचे बेट उभे करायचे,तर अंधाराशी सामना करताना वेदना सोबतीला घ्या म्हणजे दुःखाची भीती राहणार नाही. असा अनुभवजन्य दृढ विश्वास त्याची कविता देते.तसेच कुणी वादळ व्हा. कोणी लाटा व्हा. म्हणजे या प्रलयातून कोणाची सुटका होणार नाही. विषमतेची राख केल्याशिवाय हा वणवा आता शांत होणार नाही.अशा शब्दात ती अश्वस्त करते.क्रांतीची वाट अडचणीची असते. पावलोपावली दगा फटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सर्वांनी बेसावध राहून चालत नसते.सतर्क राहण्याची गरज आहे.हे सामाजिक वास्तव राठोड किती समर्पक शब्दात व्यक्त करतात. ‘किती भयान अंधारुन आले बघ भोवताली
जरा जपून करायला हवी राहगुजारी ….. या वाटेवरून
खूप दूरवर करायची आहे पायपीट… तुला मला
भोवताली आहेत मुक्या गर्दीचे प्रचंड लोट
गुदमरून जाताहेत श्वासोच्छवास
कुठे नेऊन टाकत असतील
दिवसभराचा वाहून वाहून
साचलेला विचारांचा कार्बन-डाय-ऑक्साईड
की साचवून ठेवत असतील मनातच ….काळे ढग होईपर्यंत ’
सामाजिक संघर्षात प्रत्येकालाच सावध राहावं लागतं. कारण आपल्या सभोवताली अनेक पहारेदार गुप्त रुपाने वास्तव्य करतात. आपल्या अवतभोवतीच्या पायवाटा, रस्ते भीतीपोटी केव्हां कुणाला फितूर होतील.सांगता येत नाही. आपल्या सोबतची माणसंही मैदान सोडून केव्हां नाहीशी होतील सांगता येत नाही.म्हणून या संघर्षात केव्हाच हतबल व्हायचं नाही. असा विश्वास त्यांची कविता चळवळीतील सामान्य कार्यकर्त्याला देवून जाते.
. ‘ हा उधळला भंडारा काय व्हायचं ते होऊ दे …!
ही कविता नाहीये केवळ ही आहेत आरोळ्या ठोकत उजेडाच्याआसेने
चालती झालेली बिन भरवशाची पावले
उजेडल्याशिवाय थांबणारच नाहीत.
काही झालं तरी .
इथे नाहीत शब्दांचे कोरडे वांझ बुडबुडे
या पहा धापा कालच्या आजच्या
हे छातीत जळजळणारं हलाहल
ओतायचंय कानात व्यवस्था चिनाल रांडेच्या.’
हे सगळं बेभरवशाचं भटाक्याचं आयुष्य घेऊन किती दिवस जगायचं. हा अंधाराचा रस्ता उजेडल्याशिवाय तशी ही पावलं थांबणार नाही. कारण त्यांनी ध्यास घेतलाय या व्यवस्थेला धडा शिकविण्याचा. तेव्हा तोपर्यंत ते शांत बसणार नाही. आज स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली. तरी सामान्य माणसाचं जगणं सुसाह्य झालं नाही. या बधीर आणि मुकेपणाचं सोंग घेऊन बसलेल्या व्यवस्थेला उखडून टाकण्यासाठी क्रांतीशिवाय दुसरा कोणताच पर्याय दिसत नाही. आणि क्रांती रक्त सांडल्याशिवाय होत नाही. हे सांगताना त्यांची कविता आग ओकते.एल्गार पुकारते.
‘चल आता बोंब मारलीच पाहिजे
हा उधळलाय भंडारा
काय व्हायचं ते होऊ दे
नाही तरी अशीही
आपली मातीच होणार आहे की.’
अशी आरपारची भाषा करताना त्यांची कविता दिसते. कारण त्यांच्या जगण्यातलं हे भयाण वास्तव आहे . त्या गुलामीची आर्त किंकाळी आहे. कारण कोणताही हुंकार अन् ओंकार हा एकाएकी बाहेर पडत नाही. त्यामागे त्याच्या भूतकाळातील विषमतेचं, गुलामीचं वास्तव उभं असतं. त्या वास्तवाची ही निर्मिती असते. युगानुयुगं ज्या गुलामीत सामान्य माणूस जगतो, त्याची एक सहनशीलता असते. त्या सहनशीलतेचा अंत झाला की क्रांती ही ठरलेलीच असते. हा जगाचा इतिहास आहे. ही एक नैसर्गिक कृती आहे. जन्मताच गुन्हेगार म्हणून कपाळावर शिक्का घेऊन आलेला माणूस स्वतंत्र भारतातही माणूस म्हणून जगू शकत नाही. कवीच्या हृदयाला ही विसंगती उद्ध्वस्त करते.
कवी जेव्हा एकांतात असतो तेव्हा तो कवितेशी हितगुज करतो.तो कवितेशी तिथल्या रीतीरिवाज यांची ओळख करून देतो.तिथल्या रूढी, परंपरा, तिथली भीषणता याची जाणीव करून देतो. कफल्लक भटक्याचं जीवन जगणाऱ्या, उजाड माळरानासारखं आयुष्य घेऊन गावोगाव फिरणाऱ्या, इथं तिथं पाल टाकून चार दिवस लोटणा-या, अशा तांड्यातला मी एक सामान्य माणूस.“कविते तुझं आणि माझं काय नातं ? तू तरी मला पदरात घेशील का ? समाजव्यवस्थेने मला नाकारलं. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जन्मताच हिरावून घेऊन गुन्हेगार ठरवलं. ह्या सगळ्या भळभळत्या जखमा घेऊन जगताना कविते मी कोणती स्वप्न पाहू.? कारण स्वप्न बघण्याचा अधिकारच मला नाही .मला कोणत्याच गावाने, कोणत्याच देवाने स्वीकारले नाही. निदान तू तरी स्वीकारशील का ?” याचक होऊन अशी हतबलता व्यक्त करतो. “दगडाला देव मानून चालणारी परंपरेची पावलं .ज्यांना सामावून घेतलं नाही कोणत्या शिवेने. कोणत्याच गावानं. निदान तू तरी माझ्यात मिसळली. माझ्या माणसात मिसळली. पण पुन्हा कधीतरी गावासारखी तू मला वाळीत तर टाकणार नाहीत ना ? मला सोडून तर जाणार नाहीत ना ? तुझ्याशी बोलतांना संवाद करताना मनातलं दाटलेलं सारं मळभ मी मोकळ करतो तुझ्या ओंजळीत. तेव्हा मला बरं वाटतं. कविते बारागावच्या बारा वाटा आणि अठरा घाट हिंडून आलेला माझा तांडा आणि मी कफल्लक झालोय. भटका बनलोय. कविते तू अशा कफल्लक फाटक्याला आपलंसं केलं. आणि म्हणून तुझे उपकार कसे फेडू. तू मला अशी काही स्वप्न दाखवलीस की ती माझ्या बापजाद्यांनी कधीही पाहिली नव्हती.” अशा शब्दात कवी कवितेशी मनमोकळेपणाने संवाद करताना दिसतो. आणि विनंती करतात-
‘ तुझ्या छातीतलं धडधडणारं धाडस
ओठातली थरथर उतरू दे माझी आत
खोलवर मुरु दे तुझ्यातलं खळखळणारं विद्रोहाचं पाणी
म्हणजे आपोआप रुजू लागतील मुळ
या मनात खूप अंधार साचलाय युगानुयुगापासूनचा
एक दिवा तू पेटवलास या देहात
थांब अशीच या गाभार्यात…. थोडासा होऊ दे उजेडाचा स्पर्श .’
स्पर्शात किती सामर्थ्य असतं. शिक्षणाचा स्पर्श असो की विचारांचा स्पर्श असो त्यातून माणसाचं आयुष्य उजळून निघतं. हे मात्र नक्की. कवितेच्या माध्यमातून विचारांचा उद्रेक कागदावर उतरवता आला. मनाचा निचरा करता आला.आतलं ठसठसणारं व्यक्त करता आलं. कवितेच्या रुपानं हे सगळं मांडता आलं. याचा कवीला नितांत अभिमान वाटतो.वीरा राठोड आपल्या कवितेतून प्रामाणिकने व्यक्त होतात.त्यांच्या कवितेत येणा-या प्रतिमा त्यांच्या अवतीभोवतीच्या वास्तवातून येत असल्याने त्यांच्या कवितेचं वेगळेपण अधोरेखित करतात. तसेच तुक्याचा महामंत्र, बुध्दाचा ध्यानपथ,कबीराचे सूत्र ,सॉक्रेटीशचं छंदशास्त्र, राम ,अल्लाचा फिरस्ता,बायबल.कुराण,चर्च,मकबरा,उत्तराचं कुरुक्षेत्र,कुर्बानीची याद, या सारखे कितीतरी शब्द सामाजिक समतेचे संदर्भ त्यांच्या कवितांमधून घेऊन येतात. त्याच प्रमाणे गोरमाटी-बंजारा बोलीतील तांडा,पाल,तलब,आरदास,छोरी,सिकवाडी,डिंगल,लदेणी,गेर,काचळी, चिरा,मल्ला,विरेणा, याडी, वीरा,विडा,केसुला असे कितीतरी बोली भाषेतील शब्द कवितेच्या आशयाला अधिक समृध्द करतात.
मराठी साहित्यात संत साहित्याचे महत्त्व हे कुणीही नाकारू शकत नाही. कारण संतांनी सामाजिक समतेच्या संदर्भात भरीव असे योगदान दिले आहे. महानुभाव संप्रदायाने स्त्रियांच्या उन्नतीकरिता त्याचप्रमाणे जातीभेदाचे उच्चाटन करण्यासाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले आहे. त्यानंतरच्या ज्ञानदेव तुकाराम या संतांच्या परंपरेमध्ये सर्व संतांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातल्यात्यात तुकारामासारखा संत सर्वसामान्य माणसाचे जीवन जगताना झालेल्या हाल-अपेष्टा आणि त्यातून अभंगांची निर्मिती करताना दिसतो. अनुभवातून आलेली अनुभूती ही अत्यंत महत्वाची असते आणि म्हणून संत तुकारामाचे अभंग हे साऱ्याच कवींना प्रेरणा देणारे ठरतात. कवी वीरा राठोड हे तुकारामाशी संवाद साधताना म्हणतात-
‘ तुकारामा तुझी शिवी माझ्या रक्तात भिणू दे
तूझ्या ओवीत माझा जीव चिनू दे
माझी चाम्बडी बधिर झालीय सोलून काढ
पापणीचं वाळवंट झालंय तेजाबात बुडव
रक्ताचं पाणी तरी होईल सळसळत नाही गोठून बसलंय. ’
अशा शब्दात कवी तुकारामाची आराधना करतो, आळवणी करतो. कारण समाजव्यवस्थेच्या प्रत्येक टप्प्यात शोषक आणि शोषित यांचा संघर्ष रंगलेला दिसतो. म्हणून तुकाराम आता व्यक्ती न राहता प्रवृत्ती बनली पाहिजे. प्रत्येक काळात सत्प्रवृत्त होऊन समाजमनाचं नेतृत्व करताना दिसते. अन्यायाविरुद्ध लढताना उभी राहते. म्हणून कवी म्हणतो- ‘ तुकाराम वाणी…. कुठे गेला
शोधा शोधा पकडा त्याला बुडवा त्याला
अशी कुजबूज अजूनही चालतेच आहे
पण या वेळेस गावणार नाही त्यांना तुकाराम
तो आहे सहीसलामत बुबुळांच्या खोबणीत
कवटीच्या भगदाडात … छातीच्या भात्यात
धमण्या धमण्यामध्ये साठवून ठेवलेला
जन्मभर पुरेल एवढा .’
थोडक्यात संत तुकारामांचे शाश्वत अभंग प्रत्येकाला जगण्याचं बळ देतात. त्यामुळे तुकाराम त्यांच्या अभंगांच्या रूपानं विचारांच्या अंगानं कवी आपल्या रक्तात,पेशीत तुकारामाला साठवून ठेवतो.हा विचारच वर्तमान कालीन समाजव्यवस्थेत कवी आपल्या समर्थ लेखणीतून पुन्हा नव्याने रुजू पाहतोय. सभोवतालचे वातावरण प्रदूषित झाले आहे. हवा किती अशुद्ध बनली आहे. ती शुद्ध करण्यासाठी वाऱ्याच्या तोंडी उभे राहून तुकारामाला हवेत उपणण्याची भाषा करतो. तुकाराम अभंगातील शब्दातून हवेत तरंगत रहावा युगानुयुगे . अशी आळवणी कवी करतो . थोडक्यात याविचारातून संत तुकारामांच्या कवितेचं सामर्थ्य कवी अधोरेखित करतो. आजही समाजमनात तुकाराम असण्याची नितांत गरज आहे. तरच नाठाळाच्या माथी काठी घालता येईल. हा आशावाद कवी व्यक्त करतो. कारण ती काळाची गरज आहे. संत तुकाराम ही प्रवृत्ती बनवावी. तरच समाजातली विषमता नष्ट होऊ शकेल. सामाजिक समतेचे तत्त्वज्ञान रुजू शकेल. असा विश्वास कवीला वाटतो.
कवी वीरा राठोड यांची कविता म्हणजे भळभळत्या जखमाची संवेदना. वीरा राठोड यांची कविता म्हणजे अठराविश्व दारिद्र्याचा कबिला पाठीवर घेऊन , विराण माळ पायाखाली तुडविणाऱ्या तांडा नावाच्या लोकवस्तीची ज्वालाग्रही वेदना आहे. वीरा राठोड यांची कविता म्हणजे स्वतःबरोबरच समाजातील लोकसंघर्षाची कविता आहे.अशा दोन भूमिकेतून त्यांची कविता वाटचाल करतांना दिसते. त्यांची कविता पालावरच्या जगाचं वास्तवदर्शी चित्र चितारतांना दिसते. तिथल्या व्यथा-वेदना, रूढी, परंपरा, रीतिरिवाज, याचबरोबर तिथल्या जगाचं एक वास्तव जगणं घेऊन त्यांची कविता येते. त्यांच्या कवितेचा स्थायीभाव हा संघर्ष आहे. माणसा माणसातील संघर्ष, रुढी-परंपरांशी संघर्ष, सामाजिक संघर्ष, हक्कांसाठीचा संघर्ष, शिक्षणाचा संघर्ष, नात्यागोत्यातील माणसाचा संघर्ष, त्यांच्या कवितेत ओतप्रोत भरलेला दिसतो. म्हणून त्यांची कविता ही वेदनेची कविता आहे. वेदनेचं गाणं आहे. कबीराच्या जखमांचं देणं आहे.पालावरचं वास्तव मांडताना वीरा राठोड लिहितात-
‘ अंबाडीचा पाला
उकळून खाल्लेल्या दिवसाची कथा सांगू लागतो बा
डोळ्यात आसवांचा डोंब भरून
हुलग्याची, मोह फुलांची भाकर भिजत राहिली
आठवणींच्या कालवणात
मायबाप, गणगोत, सोय-या–धाय-यांचा
माणसांच्या यादीत लागला नव्हता नंबर
तेव्हाची गोष्ट आहे……’
ती गोष्ट सांगताना वीरा राठोड पालावरच्या जगाचं भयावह चित्र रेखाटतात.भुकेल्या चिल्यापिल्यांच्या तोंडात चार दाणे पडावे म्हणून कणसं चोरली तर गावकऱ्यांनी जनावरासारखे हाल करून गावातून पिटाळून लावल्याची आठवण सांगतात. किंवा कुठेही चोरी झाली तरी गुन्हेगार म्हणून पोलीस शोध घेत तांड्यावर येतात. माया बहिणीची अब्रू लुटतात. हे भयानक विदारक सत्य ते कवितेतून मांडतात. समाजव्यवस्थेच्या रखवालदारांचाच अन्याय, अत्याचार, जुलुमाचा आणि त्यांच्या दुष्कृत्यांचा पाढा ते वाचतात.ही अत्यंत भयावहक शोकांतिका आपल्या कवितेतून मांडतात.
अशावेळी त्यांची लेखणी आग ओकते.१५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. तरीही ही गुन्हेगारीचा शिक्का कपाळावरून पुसण्यासाठी पाचवर्ष सोळा दिवस आमचे स्वातंत्र्य गर्भात होते. असे उपाहासात्म्क भाष्य ते करतात. कारण या देशाच्या नागरिकांना स्वातंत्र्य मिळाले. आम्हाला नाही. आम्ही या देशात राहतो कुठे ? माणूस म्हणून आमची नोंद कुठेच नाही. म्ह्णून तर आमची गुलामी कमी झाली नाही. ३१ ऑगस्ट १९५२ ला आम्ही मुक्त झालो. विमुक्त झालो. गुन्हेगार म्हणून आमच्या कपाळावरचा शिक्का पुसल्याचे शिक्कामोर्तब झाले. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती मात्र जशी होती तशीच राहिली. हे खेदाने नमूद करतात. त्यामुळे मनावरचे गुन्हेगारीचे वळ हे अजूनही पुसले नसल्याची जाणीव त्यांच्या कवितेतून होते. ते लिहितात-
‘अरे थू तुमच्या ज्ञानावर
चोर गुन्हेगार जमातीचा पाठ
कायद्याच्या पुस्तकात अजूनही जिवंत आहे
कित्येक पिढ्या स्वातंत्र्यानेही नासवल्या
हे कसलं स्वातंत्र्य ….! थू …’
अशा शब्दात त्यांची कविता ही स्वातंत्र्याचा अव्हेर करताना दिसते. कारण ज्या स्वातंत्र्याने बेरीज करण्याऐवजी माणसांची वजाबाकीच केली. त्याचा राग त्यांच्या कवितेतून अभिव्यक्त होतो. कारण त्यांची कविता वर्तमानावर भाष्य करताना जळजळीत सत्य मांडत जाते. त्यांच्या जगण्यातला आक्रोश कवितेच्या शब्दातून मोकळा होतो. म्हणून त्यांची कविता ही त्यांनी भोगलेल्या अनुभवाशी एकनिष्ठ राहते. समाजव्यवस्थेचा खोटा नकाब फाडण्याचे काम ती करते.
आज आम्ही स्वतंत्र भारतात सत्तर वर्षापासून स्वातंत्र्याचा आस्वाद घेतो. विकासाची फळं चाखतो. परंतु समाजव्यवस्थेचा एक घटक असलेला भटका-विमुक्त समाज अजूनही वनवासाची वाट चालतो आहे. अजूनही पायात गुलामीचे साखळदंड बांधून फिरतो आहे. कधी संपणार हा त्यांचा जीवघेणा प्रवास. त्यांच्या अंतकरणाची हाक कधी ऐकायला येणार ? व्यवस्था आजही त्यांच्याशी शकुनीची क्रूर चाल खेळताना दिसते. त्यांच्या मुक्या वेदनेचा तांडा अजूनही रामराज्याच्या आशेवर चालतो आहे. अजूनही भटक्या-विमुक्त माणसांना इथल्या व्यवस्थेने माणूस म्हणून स्वीकारलेले नाही. ही मनातील खंत वीरा राठोड आपल्या कवितेतून व्यक्त करतात. कोणत्याही व्यवस्थेशी लढाई करणे म्हणजे विद्रोह करणे असे नाही. न्यायासाठी संघर्ष द्यावाच लागतो. लढा उभारावाच लागतो. विद्रोह हा समतेसाठी असतो. समतेसाठी केलेली कोणतीही लढाई हिंसक नसते. आज समतेचे तत्व आणि तत्वज्ञान हरवत चालले आहे. विद्रोह म्हणजे वैर नाही. आपल्या कवितेतून ते जागोजागी अधोरेखित करताना दिसतात. इतकंच नव्हे तर दुःख सुंदर नसतं पण त्यात गाणं असतं. हे सांगायला कवी विसरत नाही. पारध्यांना काम मिळत नाही म्हणून पोटासाठी चो-या करायच्या. पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून आयुष्यभर भटकंती करायची. कोल्हाट्याच्या मुलींनी नाचायचं. वासुदेवाच्या पोरांनी ‘दान पावलं’ सांगत गावोगाव भटकत फिरायचं. गोंधळ्याने आयुष्यभर गोंधळ घालत फिरायचं. बहुरुप्यानं आयुष्यभर विविध रूपं घेत आयुष्य जगायचं ? हा रिवाज स्वातंत्र्यानंतरही कमी झालेला नाही. अजूनही आम्ही माणसात नाही. अशा शब्दात कवी व्यवस्थेवर आसूड ओढतो. ‘आई जेवू घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही’ अशा स्थितीत समाज जगतोय.स्त्रियांच्या वाट्याला अत्यंत वाईट जिणं भाग पडतं. एक तर तरुणपणात शरीर विक्रय करणे आणि म्हातारपणात भुकेला भिकेचा आसरा घेणे. याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही.म्हणून कवी वीरा राठोड लाल कंपनीच्या संगिनीला सलाम करताना लिहून जातात-
‘ तू फुलन कुठे जन्माला आलीस
या जन्मठेपेच्या बंदिखान्यात
जिथे डांबल्या गेल्या … भोगल्या गेल्या …
नागवल्या … नाचवल्या तुझ्यासारख्या
कित्येक भटक्यांच्या लेकीसुना
आजही भोगाच्या भुकेला वाहिल्या जातात
अर्ध्य म्हणून तुझ्यासारखी फुलं सैतानाच्या सजेला
तहान तुझ्या भोगाची
या देशाला लागण सनातनी रोगाची
बाहुलीच्या वयात भोगाच्या बडव्यांनी
भोगला तुझा भूत, भविष्य, वर्तमान
आणि घातला तुला रक्ताचा लालेलाल अभिषेक ’
अशा शब्दात आजच्या वर्तमान कालीन समाजव्यवस्थेचे विदारक चित्र वीरा राठोड या कवितेत रेखाटतात.
पुढे जाऊन ते लिहितात-
‘ तुझ्यातलं बाईपण वाट अडवून मारलं गेलं
पावलापावलावर तुझ्यातही होती एक राधा …
एक मीरा … एक सीता …..
किंवा ‘ तू केलास एल्गार वर्णसनातनी ठेकेदारांच्या सल्तनतमध्ये
शिरावर बांधून लाल कफन
रक्ताची होळी खेळायला चंडी झालीसं …चंबळची ’
आजही इथली स्त्री सुरक्षित कुठे आहे. आजही अशा कित्येक फुलन दिवसाढवळया लुटल्या जात आहेत. हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. उमाजी नाईकाने आपल्या हाजोरो सहका-यांच्या मदतीने स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती दिली. पुढे त्यांच्या अनुयायांना गुन्हेगार म्हणून आजपर्यंत फासावर दिले गेले. म्हणून उमाजीचे बलिदान वाया गेल्याची खंत कवी व्यक्त करतो. तर विष पेरणारे युध्द आम्हाला नको आहे. त्याऐवजी कवी बुध्दाचा शोध घेण्याची भाषा करतांना दिसतो. आज शिकूनसवरून,पदव्या मिळवूनही भटक्यांच्या आयुष्याची पायपीट थांबत नाही. बापजादे पोटासाठी रानावनात भटकत. आणि आम्ही उसनं आवसान आणून पोटासाठी उंबरठे पायाखाली घालतोय.या छिनाल झालेल्या व्यवस्थेत चामडीला चामडी आणि दमडीला दमडी घासल्याशिवाय कोणतंच काम होत नाही. हे वास्तवसत्य कवितेतून कवी सांगून जातो. मनाच्या आशेवर आणि जगण्याच्या धगीवर इथल्या माणसांच्या आयुष्याचे तांडे अनवाणी पायांनी आणि जीवाच्या आकांताने चालतात. त्यांची कविता न्याय आणि हक्क इथल्या व्यवस्थेच्या बडव्यांनी सालोसाल लुटल्याचा टाहो फोडते. वीरा राठोडांची कविता त्यांच्या जगण्याची रेखाटनं चितारतांना दिसत असली तरी तिचा कॅनव्हास अत्यंत व्यापक आहे.ती भटक्या विमुक्तांच्या समग्र आयुष्याचा आकृतिबंध मांडत जाते.अंगण उजळून निघावं म्हणून विस्तव पचवला. तरीही स्वप्नांची राखच झाल्याची खंत व्यक्त करत प्रस्थापित व्यवस्थेचा पंचनामा त्यांची कविता करतांना दिसते.थिगळाला थिगळ लावून आयुष्य सुंदर करण्याचं तांड्याचं भावविश्व त्यांच्या कवितेत पावलोपावली दिसतं.असे अजून किती दिवस ही जगण्याची सोस सोसावी लागेल. हा व्यवस्थेचा सनातनी अंधार दूर सारून भटक्या विमुक्तांच्या आयुष्यात खरंच समृद्धीचा प्रकाश केव्हा पडेल ? तो दिवस खरोखर उगवेल का ? असा प्रश्न त्यांची कविता करतांना दिसते. अशा भयान वास्तवाचं तांड्यातलं आयुष्य सोबत घेऊन जगताना आईनं ( याडीनं ) काजळासोबत डोळ्यात नव्या दिवसांची स्वप्ने भरली. दुख:ला सावली देण्याची भाषा शिकविली. इतकेच नव्हे तर ‘जोवर हलतील ओठ तोवर काहीतरी गुणगुणावं’ अशी उर्मी मनात भरली. कधीच नाऊमेद न होता जगण्याचा आशावाद शिकविला असल्याचे कवी अभिमानाने कवितेतून मांडतो. माता आणि मातीवर प्रेम करणारा कवी वीरा राठोड विश्वासाठी ‘ सेनं सायी वेस ’मधून विश्वकल्याणाचे पसायदान मागायला विसरत नाही. अशा कवी प्रा.डॉ. वीरा राठोड यांना त्यांच्या कवितेच्या पुढील प्रवासाला खूप सा-या शुभेच्छा.
(लेखकाशी संपर्क मो. ९४२२७५७५२३ ई मेल laxmanmahadik.pb@gmail.com)
Very good achievement वीरा,congratulations???? असच चालत रहा “Best of luck”
इंडिया दर्पण चे आणि प्रा. लक्ष्मण महाडिक सरांचे मनःपूर्वक आभार ! अतिशय सुरेख आणि सविस्तरपणे भाष्य केलय आपण. अनेक नवीन पैलु उलगडून दाखवलेत आपण या लेखातून . आपल्या या लेखामुळे माझे लेखन वाचकांपर्यंत पोहचायला मोलाची मदत झालीय . खूप खूप धन्यवाद !
आदरणीय महाडिक सर अतिशय अभ्यासपूर्ण आणि सखोल लेखन !आपण आदरणीय वीरा सरांची नव्याने ओळख करून दिली,आपले खूप आभार! वीरा सरांबद्धल ऐकायला वाचायला नेहमीच आवडते,अतिशय सुंदर व्यक्त होतात नेहमी ते!आपलेही लेखन नेहमीच मनाला भावते.अप्रतिम! मान्यवरांना शुभेच्छा!धन्यवाद!!