नाशिक – ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ या वेब न्यूज पोर्टलने अवघ्या १५९ दिवसातच तब्बल ११ लाख दर्शकांचा (व्ह्यूज) टप्पा पार केला आहे. अशा प्रकारचे यश मिळविणाऱ्या मोजक्या न्यूज पोर्टलमध्ये ‘इंडिया दर्पण लाईव्ह’चा समावेश झाला आहे. याचनिमित्ताने ‘इंडिया दर्पण’ या साप्ताहिकाच्या २१ व्या विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते रविवारी (१० जानेवारी) भुजबळ फार्म येथे करण्यात आले.
कोरोनाच्या काळात गतिमान वृत्तसेवा देणाऱ्या ‘इंडिया दर्पण मिडिया हाऊस’ या मिडिया स्टार्टअपचा शुभारंभ करण्यात आला. याच्या माध्यमातून ‘इंडिया दर्पण’ हे साप्ताहिक, ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ हे वेब न्यूज पोर्टल, यू ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, टेलिग्राम व ट्विटर अकाऊंट, व्हॉटसअॅप वृत्तसेवा सुरू करण्यात आली. अतिशय दर्जेदार, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांमुळे ‘इंडिया दर्पण’ची लोकप्रियता अल्पावधीतच मोठे शिखर गाठणारी ठरली आहे. त्यामुळेच ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ने अवघ्या १५९ दिवसातच तब्बल ११ लाख दर्शकांची संख्या ओलांडली आहे. कोरोनाच्या काळात सुरू झालेल्या सोशल मिडिया वृत्तसेवांमध्ये हा मैलाचा दगड ठरला आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ‘इंडिया दर्पण’च्या विशेषांकाचे प्रकाशन रविवारी करण्यात आले. माध्यम क्षेत्रावरही कोरोनाने मोठा आघात केला, अशा काळात ‘इंडिया दर्पण’ने मुहूर्तमेढ रोवून जे देदिप्यमान यश मिळविले आहे, ते वाखाणण्याजोगे असल्याचे कौतुकोद्गार भुजबळ यांनी काढले. तसेच, त्यांनी ‘इंडिया दर्पण’च्या संपूर्ण कामकाजाची माहिती घेऊन शुभेच्छा दिल्या.
‘इंडिया दर्पण’चे संपादक गौतम संचेती यांनी या समारंभाचे प्रास्ताविक करुन आभार मानले. साहित्य व संस्कृती क्षेत्राचे संपादक देविदास चौधरी यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. कार्यकारी संपादक भावेश ब्राह्मणकर यांनी सूत्रसंचालन करुन वेबसाईटचे सादरीकरण केले. याप्रसंगी ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष दत्ता भालेराव, प्रा. डॉ. प्रसाद जोशी, ज्येष्ठ वकील शिरीष कडवे, प्रयोगशील शिक्षक अनिल शिनकर, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद बाविस्कर, कल्पेश बेदमुथा, महेश कुलकर्णी, वसंतराव ब्राह्मणकर, जगदीश देवरे, इंडिया दर्पणचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह राहूल भदाणे, सातपूर येथील प्रतिष्ठीत व्यापारी नितीन ब्राह्मणकर, योगेश ब्राह्मणकर,पराग पाटोदकर, हेमंत वाले, आसिफ बेग, ललित धांदल आदी उपस्थित होते.