इंडियन आईस्क्रीम मॅनुफॅक्चरर्स अससोसिएशन सचिव आशिष नहार यांनी दिली माहिती
नाशिक – इंडियन आईस्क्रीम मॅनुफॅक्चरर्स अससोसिएशनद्वारे नाशिक येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत मार्चमध्ये आईस्क्रीम डे सुरुवात करण्याचे स्वप्न बघितले होते. ते आता पूर्णत्वास जात असून आईस्क्रीम डे हा २० मार्च २०२१ पासून साजरा करण्याचा निर्णय इंडियन आईस्क्रीम मॅनुफॅक्चरर्स अससोसिएशने घेतला आहे. या बाबत राष्ट्रीय आईस्क्रीम डे जाहीर करावा अशी मागणी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या कडे करण्यात आल्याची माहिती इंडियन आईस्क्रीम मॅनुफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव आशिष नहार यांनी दिली.
ते म्हणाले की, २० मार्च रोजी संयुक्त राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय आनंदाचा दिवस साजरा केला जातो, जगभरातील लोकांच्या जीवनात आनंदाचे असलेले महत्त्व ओळखण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असल्याने आईस्क्रीम डे २० मार्च रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आईस्क्रीम डेची मुहूर्तमेढ नाशिकमधून होत असल्याने भविष्यात नाशिक व महाराष्ट्र राज्याच्या आईस्क्रीम व डेअरी उद्योगांना अनन्य साधारण महत्व प्राप्त होणार असल्याने नाशिकमधील फूड उत्पादन करणाऱ्या उद्योजकांमध्ये नवीन चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील सर्व मल्टीनॅशनल उद्योगासमवेतच लघु व परदेशी उद्योग यामध्ये सहभागी होत असल्याने नवीन तसेच सुरु असलेल्या उद्योगांना नवीन तंत्रज्ञान व उद्योग विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाची माहिती या आयोजित करण्यात येणाऱ्या आईस्क्रीम डे मुळे होणार आहे.
आईस्क्रीम व डेअरी उद्योगांची जनजागृती करण्यासाठी तसेच एप्रिल, मे व जून मध्ये आईस्क्रीम उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने या डे चे आयोजन प्रथमच करण्यात येत असल्याची माहिती नहार यांनी दिली
आईस्क्रीम उद्योगांच्या उत्पादनास एप्रिल, मे व जून या महिन्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते पण मागील वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोना विषाणू सोबत लढत आहे. या विषाणूमुळे आईस्क्रीम उद्योगांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागले उत्पादित झालेल्या आईस्क्रीमचे वितरण पुरेशा प्रमाणात न झाल्यामुळे आईस्क्रीम उद्योगात फार मोठी निराशा निर्माण झाली आहे. या उद्योगांची जनजागृती करण्यासाठी तसेच उद्योगांना सद्यपरिस्थितीत ज्या संकटाना सामोरे जावे लागत आहे या बाबत सर्व उद्योगांना मार्गदर्शन होण्यासाठी या डे ला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.
आईस्क्रीम व डेअरी उत्पादनास भारतातील सर्वसामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्यांच्या गरजेनुसार उत्पादनात बदल करून दर्जेदार उत्पादन देण्यासाठी तसेच फूड सेफ्टी कायद्यात असलेल्या विविध समस्यांचे निरसन करण्यासाठी प्रयत्न होणार आहे. भारतातील तसेच परदेशातील आईस्क्रीम उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी या डे ला उपस्थित राहणार असून भारतातील सर्व आईस्क्रीम उत्पादन करणाऱ्या लघु, मध्यम उद्योगांना आपल्या उद्योगात नवीन तंत्रज्ञानाचा व बाजारात उपलब्ध असलेल्या मागणीचा योग्य विचार करून आईस्क्रीम उद्योगात कशा पद्धतीने पुन्हा एकदा चालना मिळू शकते तसेच या उद्योगांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, याबाबत मार्गदर्शन यावेळी मिळणार असल्याचे नहार म्हणाले. २० मार्च रोजी आईस्क्रीम पार्लर आकर्षक पद्धतीने सजविण्यात येणार असून आईस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात सूट या दिवशी मिळण्याची शक्यता आहे असेही नहार यांनी सांगितले.