नवी दिल्ली – मोबाइल इंटरनेट स्पीड आणि फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडचा विचार करता भारताच्या क्रमवारीत डिसेंबरमध्ये घसरण झाली आहे. मोबाइल इंटरनेट स्पीडच्या क्रमवारीत भारत १२९ व्या तर फिक्स्ड ब्रॉडबँडच्या स्पीडमध्ये ६५ स्थानावर आहे. तर कतार हा देश मोबाइल इंटरनेट स्पीडमध्ये सर्वात आघाडीवर आहे. त्याने थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर फिक्स्ड ब्रॉडबँडच्या स्पीडमध्ये थायलंडने बाजी मारली आहे.
स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्स Ookla च्या अहवालानुसार, भारतातील मोबाइल इंटरनेट डाउनलोड स्पीडमध्ये नोव्हेंबरच्या १३.५१ एमबीपीएसच्या तुलनेत डिसेंबरमध्ये ४.४ टक्क्यांची घट होऊन तो १२.९१ एमबीपीएस एवढा झाला. स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सच्या २०२०च्या डिसेंबरच्या डेटानुसार, भारतात मोबाइलवरून अपलोड करण्याच्या स्पीडमध्येही घट झाली आहे. तर कतारमध्ये मोबाइल डाउनलोडिंग स्पीड सर्वाधिक म्हणजे १७८.०१ एमबीपीएस एवढा नोंदवला गेला. दुसऱ्या स्थानावर संयुक्त अरब अमिराती (१७७.५२ एमबीपीएस) तर त्यानंतर अनुक्रमे दक्षिण कोरिया, चीन आणि ऑस्ट्रेलियाचा नंबर येतो.
फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीडचा विचार केला तर ५३.९० एमबीपीएस सरासरी डाऊनलोड स्पीडने भारत ६५ व्या क्रमांकावर आहे. डिसेंबरमध्ये हाच स्पीड ५०.७५ एमबीपीएस एवढा होता. फिक्स्ड ब्रॉडबँडच्या स्पीडमध्ये थायलंड सर्वात आघाडीवर आहे. येथील डाऊनलोडचा स्पीड हा ३०८.३५ एमबीपीएस एवढा आहे. थायलंडनंतर अनुक्रमे सिंगापूर, हाँगकाँग, रोमानिया आिण स्वित्झर्लंडचा नंबर लागतो.