लंडन – जगातील पीफायजर या कंपनीच्या कोरोना लसीच्या वापराला इंग्लंड सरकारने परवानगी दिली असून ही लस आता सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोरोना लसीच्या वापराला परवानगी देणारा इंग्लंड हा जगातील पहिला देश बनला आहे.
जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूला प्रतिबंध घालणारी कोरोना लस अखेर झाली आहे. Pfizer-BioNTech या लसीच्या वापराला इंग्लंड सरकारने मंजुरी दिली आहे. जगभरात तब्बल साडेसहा कोटी जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकट्या इंग्लंडमध्येच बाधितांची संख्या १६ लाखांहून अधिक आहे. अनेक देशांमध्ये सध्या कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे. मात्र, इंग्लंडने कोरोना लसीच्या वापराला मुभा देऊन सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे. ही सल पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये सर्वसामान्यांना मिळू शकणार आहे. ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे. इंग्लंड सरकारने या लसीचे ४ कोटी डोसची ऑर्डर फायजर कंपनीला दिली आहे. २ कोटी लोकसंख्येसाठी प्रत्येकी २ डोस यामुळे उपलब्ध होऊ शकणार आहेत. यातील एक कोटी डोस येत्या काही दिवसातच मिळणार आहेत.
दरम्यान, लस आली तरी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि सतत हात धुणे हे करावेच लागणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.