मॉस्को – ब्रिटेनमध्ये फायझरची कोरोना लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केल्यानंतर आता रशियानेही निर्णय घेतला आहे. देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी पुढील आठवड्यापासून सामूहिक लसीकरण सुरू करण्याचे आदेश रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
राशियामध्ये स्पुटनिक -५ लसीच्या २० लाख डोसचे उत्पादन झाले आहे. ब्रिटेनने फायझर-बायोटेक्निक लस मंजूर केली आणि त्याच आठवड्यात लसीकरण करण्यास सांगितले. त्याच दिवशी रशियाने देखील ही घोषणा केली. गेल्या आठवड्यात रशियात अंतरिम तपासणीच्या निकालामध्ये ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे आढळले. इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धक लसीच्या तुलनेत तिचे निष्कर्ष पुढे आहेत.
स्पुटनिक -५ च्या क्लिनिकल चाचण्या तिसर्या आणि अंतिम टप्प्यात आहेत. यात ४० हजार स्वयंसेवकांना लसी देण्यात येणार आहे. कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे प्रमुख असलेले उपपंतप्रधान तातियाना गोलिकोवा यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याबाबत माहिती देताना पुतीन म्हणाले की, पुढच्या आठवड्याच्या अखेरीस आम्ही सामूहिक लसीकरण सुरू करू शकू. तसेच प्रथम ही लस शिक्षक आणि आरोग्य कर्मचार्यांना दिली जाईल, याकरिता पुढील काही दिवसात २० लाख डोसचे उत्पादन केले जाईल, तसेच ही लस सर्व रशियन नागरिकांना विनामूल्य दिली जाईल आणि ती ऐच्छिक असेल.