तेजपूर – कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी- वड्रा या आसाम दौर्यावर असून त्या चहा बागेत महिला कामगारांसह चहाची पाने तोडताना दिसल्या. यावेळी त्यांनी बागेत पाने तोडताना पारंपारिक पध्दतीने डोक्यावर टोपली बांधली होती. प्रियांका यांनी चहा बागेत महिला कामगारांशी गप्पा मारल्या तसेच चहाची झाडे लावण्याचे तंत्रज्ञान समजून घेतले, त्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
प्रियांका यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात प्रार्थनेने दोन दिवसीय दौर्याची सुरुवात केली. यानंतर त्यांनी लखीमपूरमधील मजुरांसह झुमूर नृत्यही केले. दुसर्या दिवशी प्रियांका राज्यातील चहा बाग कामगारांना भेटल्या, गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये चहा लागवड करणाऱ्या महीला आणि मजूर यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच त्यांनी तेजपूरमध्ये स्थानिक चहा बाग कामगारांच्या घरी जेवण केले.
https://twitter.com/INCIndia/status/1366633115452497923
कॉंग्रेसची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू असून प्रियंका गांधी वड्रा यांनीही निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. आसामच्या १२६ जागांसाठी २७ मार्च, १ एप्रिल आणि ६ एप्रिल रोजी तीन टप्प्यात मतदान होणार आहे.
https://twitter.com/priyankagandhi/status/1366644199316017158
निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. सध्या भाजपाचे सरकार असून सर्वानंद सोनोवाल हे मुख्यमंत्री आहेत. मागील निवडणुकीत भाजपाने ८९ जागा लढवल्या आणि ६० जागा जिंकल्या. आताही भाजपला तेवढ्याच जागा मिळणार की कमी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/priyankagandhi/status/1366348954711904262