नवी दिल्ली – अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा सध्या चर्चेत आहेत. राज्यातील कथित १०० कोटींचं वसुली प्रकरण त्यांनी संसदेत उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. तसंच मनसुख हिरेन हत्येचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. जो पोलिस अधिकारी १६ वर्ष निलंबित होता, त्याला महाविकास आघाडी सरकार आल्यावर कामावर पुन्हा कसं रुजू करून घेतलं. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना जेलमध्ये टाकण्याची तसचं बघून घेण्याची धमकी दिली, असा आरोप करत त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं होतं.

योग शिबीरात झाली भेट
राजकारणात येण्याआधी नवनीत राणा यांनी पंजाबी आणि दक्षिण भारतातील चित्रपटात काम केलं आहे. २०११ मध्ये त्यांनी अमरावतीच्या बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी लग्न केलं. परंतु त्यांची लव्हस्टोरी रोमांचक आहे. नवनीत कौर आणि रवी राणा यांची पहिली भेट बाबा रामदेव यांच्या आश्रमात झाली होती. दोघेही एका योग शिबिरात भाग घेण्यासाठी गेले होते. भेटीनंतर दोघेही प्रेमात पडले आणि २०११ मध्ये इज्तेमाई सामुहिक लग्न सोहळ्यात विवाहही केला. त्यांचे पती रवी राणा हे सुद्धा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पती आमदार तर पत्नी खासदार असे हे दाम्पत्य आहे.









