दिंडोरी – नाशिक-पेठ रस्त्यावर आशेवाडी शिवारात दुचाकी व कंटेनर अपघातात नाशिकरोड येथील दाम्पत्य ठार झाले आहे. या परिसरात खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेलरोड, नाशिकरोड येथील अनिल मधुकर साळवे (वय ४५) आणि त्यांची पत्नी सरला अनिल साळवे (वय ४०) हे नाळेगाव येथे नातेवाईकांकडे आले होते. नाळेगावहून ते नाशिकला बुधवारी (२६ ऑगस्ट) रात्री ८ च्या सुमारास दुचाकीवरुन (क्र. एमएच १५ बी वाय ८२२८) परतत होते.
आशेवाडी शिवारात समोरून येणारा कंटेनर (क्र. जीजे २५ एक्स ३५१०) यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात साळवे दाम्पत्य गंभीर जखमी होत जागीच ठार झाले. अपघाताचे वृत्त कळताच पोलिस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, हवालदार धनंजय शिलावट, गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
कंटेनर व चालकास ताब्यात घेत वाहतूक सुरळीत करण्यात आली. कंटेनर चालक कैलास अशोक पवार (रा. बलसाड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, सहा पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाडवी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, गायकवाड करत आहेत.
खड्ड्यांमुळे अपघाताला आमंत्रण
नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. सर्व रस्ता काँक्रीटीकरण होत आहे. मात्र, आशेवाडी व आंबेगण शिवारात डांबरीकरण झाले आहे. सदर ठिकाणी प्रचंड खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. सदर पूर्ण रस्ता काँक्रीटीकरण व्हावा, रस्त्याच्या साईडपट्ट्या कराव्यात, दिशादर्शक फलक लावावेत आणि अपघात टाळण्याच्या उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.