नवी दिल्ली – भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज येथे भेट घेतली. ही भेट का घेतली, दोघांमध्ये का चर्चा झाली याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत.
शरद पवार यांच्या येथील निवासस्थानी अचानक शेलार आले. त्यांनी पवार यांची भेट घेतली. या भेटीपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि बाळू धानोरकर हे पवार यांच्या भेटीला आले होते. शेलार यांनी कुठल्या कारणासाठी पवार यांची भेट घेतली याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप नेते नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली होती. आणि आता शेलार यांनी पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात ही बाब विशेष चर्चेची ठरत आहे.