पिंपळगाव बसवंत – आधीच तुटपुंजे मानधन…तेही कधी मिळेल, याची शाश्वती नाही… त्यात कोव्हीडचा प्रादुर्भाव…अशाही परिस्थितीत शासन नियमांचे पालन करीत घरोघरी जाऊन “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” हा उपक्रम यशस्वी करून दाखवला निफाड तालुक्यातील कारसूळ येथील वैशाली भाऊसाहेब कंक आणि अनिता शरद गांगुर्डे यांनी. त्यांच्या या कामाचे सर्व जण कौतूक करीत असून, त्यांना “आशां”मधील नवदुर्गा असेच म्हणावे लागेल.
निफाड तालुक्यातील कारसूळ हे गाव २२०० लोकसंख्येचे. या गावात आरोग्य विभाग विविध योजना राबवत असते. महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाजाचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी महाराष्ट्र सरकारने “आशा आरोग्य कार्यकर्ता” म्हणून २००७ मध्ये या योजनेची आदिवासी भागात सुरूवात केली होती. याचा फायदा होत असल्याचे लक्षात आल्यावर २००९ पासून संपूर्ण राज्यात हे अभियान राबविण्यात आले. यांची निवड ग्रामपंचायतीकडून ग्रामसभा आयोजित करुन करण्यात आली. यासाठी १० वी शिक्षण असलेल्या स्त्रियांची निवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात सुरूवातीला हे काम करण्यासाठी कोणी पुढाकार घेत नव्हते. कारण अल्पसे मानधन मिळते व ते पण वेळेवर मिळत नाही आणि काम जास्त असल्यामुळे मोठा पेचप्रसंग होता. मात्र, कोव्हीडच्या काळात या “आशां”मधील वैशाली भाऊसाहेब कंक आणि अनिता शरद गांगुर्डे या नवदुर्गांनी आपले छोटे कुटुंब सांभाळून समाजातही आपल्या कार्याचा ठसा उमटवला. कंक यांचे शिक्षण बारावी, तर गांगुर्डे यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे.
आदिवासी समाजातील वैशाली भाऊसाहेब कंक आणि अनिता शरद गांगुर्डे यांनी जातीच्या पलिकडे जाऊन आरोग्य व्यवस्थेचा “वसा” जपला. त्यांचे हे कार्य नक्कीच “कोव्हीड योद्धा” म्हणून भावी पिढीसाठी “दिशा” दाखविणारे ठरेल, हे नक्की…! या दोन्ही बरोबरच जिल्ह्यात अशा पध्दतीने सर्व ठिकाणी आशा वर्करने काम केले आहे. त्यांनाही सलाम…त्या नवरात्रोत्सावात ख-या नवदुर्गा ठरल्या आहे.
प्रतिक्रिया
कोरोना काळात सर्व नागरीक घरी होते. अशा परिस्थितीत आपणही समाजाचे काही देणे लागतो, भावनेतून नियमित आरोग्य सेवा सुरू आहे. याचा आम्हाला आनंद वाटतो.
– वैशाली भाऊसाहेब कंक, आशा स्वयंसेविका
कोरोना काळात सर्व नागरीक घरी होते. अशा परिस्थितीत आपणही समाजाचे काही देणे लागतो, भावनेतून नियमित आरोग्य सेवा सुरू आहे. याचा आम्हाला आनंद वाटतो.
– वैशाली भाऊसाहेब कंक, आशा स्वयंसेविका