नवी दिल्ली – ‘रेड मी’ने मोबाइल सोबतच आता स्मार्ट वॉचही लाँच केले आहे. चीनमध्ये हे घड्याळ लाँच करण्यात आले असून याचा लुक अत्यंत आकर्षक आहे. याची डायल चौकोनी असून यात सात स्पोर्ट मोड तसेच कॉल, मेसेज नोटिफिकेशनचेही फिचर आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची बॅटरी. तब्बल १२ दिवस ही बॅटरी टिकू शकते. काळ्या, पांढऱ्या आणि नेव्ही ब्ल्यू रंगात हे घड्याळ उपलब्ध आहे.
या घड्याळाचा डिस्प्ले रंगीत असून १.४ इंचाचा आहे. डिस्प्लेचे रिझोल्युशन ३२०*३२० एवढे आहे. तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी ग्लासची देखील सोय केली आहे. याशिवाय या घड्याळाला स्पोर्ट्स मोडचा सपोर्ट असून त्यात धावणे, सायकलिंग, पोहणे आदींचा समावेश आहे. हे घड्याळ तुमचा हार्ट रेट मोजण्यासोबतच तुमच्या झोपेवरही लक्ष ठेवते.
या घड्याळाची बॅटरी विशेष आहे. सेव्हर मोडवर टाकली तर बॅटरी १२ दिवस चालते आणि तशी नसेल तर आठवडाभर निश्चितच चालते. आणि ही बॅटरी चार्ज व्हायला २ तास लागतात. आता एवढे सगळे फीचर्स असलेल्या घड्याळाची किंमत किती, असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडला असेल. तर याची किंमत आहे २९९ चिनी युआन म्हणजे जवळपास साडे तीन हजार रुपये. या घड्याळाची विक्री १ डिसेंबर पासून सुरु होणार असली तरी ते भारतात कधी येणार याबद्दल काहीही कळले नाही.