मालेगाव – आयेशा नगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी ५ हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार श्रावण किसन माळी यास अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी माळी यास अटक करण्यात आली असून एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे. माळीची नेमणूक आयेशा पोलिस स्टेशनमध्येच आहे. एका गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी माळीने ५ हजाराची लाच मागितली. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. पोलिस स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर आरोपीकडून ५ हजार रुपयाची लाच स्विकारताना माळी यास रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी माळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा असून याप्रकरणी १०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.