नाशिक – शहर परिसरात आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने त्याची गंभीर दखल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी शहरातील हॉस्पिटल्सची पाहणी सुरू केली आहे. सकाळी ११ वाजता भुजबळ यांनी नाशिकरोडच्या बिटको हॉस्पिटलची पाहणी केली. महापालिकेच्यावतीने याठिकाणी मोठे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे सिटीस्कॅनसह काही सुविधा बंद असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची पाहणी आणि शहानिशा पालकमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त कैलास जाधव, वैद्यकीय अधिक्षक व मनपा अधिकारी होते. सेंटरमधील असुविधांबाबत पालकमंत्र्यांनी महापालिकेला खडे बोल सुनावले आहेत. बाधितांची कुठलीही गैरसोय करु नका असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी त्र्यंबकरोडवरील सिव्हिल हॉस्पिटललाही भेट दिली. तीन दिवसांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत सिव्हिल हॉस्पिटलमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. या बैठकीनंतर तासाभरातच सिव्हिल सर्जन रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. येथे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांशीही पालकमंत्र्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी-तक्रारी समजून घेतल्या.