नाशिक – आरोग्य विभागाच्या संचालकांसह वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. तसेच, त्यांनी तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध निर्देश दिले.
जिल्ह्यातील येवला व निफाड तालुक्यातील कोविड केअर सेंटर तसेच ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार, अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. दिनेश पाटील यांच्या पथकाने भेटी दिल्या. या सर्व कोवीड केअर सेंटर मधील औषध साठा, मनुष्यबळ, रुग्णांसाठी असलेले जेवण व इतर सोयी सुविधांविषयी त्यांनी माहिती घेतली. रुग्णांसाठी योगासना बाबत मार्गदर्शन करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच रुग्णांच्या मनोरंजनासाठी बैठे खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी सेंटरमधील रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. तसेच, उपचाराबाबत उपलब्ध सोयी सुविधांबाबत चर्चा केली. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना स्वतःची काळजी घेऊन रुग्णसेवा चांगल्या प्रकारे देण्याबाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. तसेच रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे त्यांनी सूचित केले.