आरोग्य विद्यापीठातर्फे जागतिक अवयवदान दिनानिमित्त ऑनलाईन चर्चासत्रात सूर
नाशिक- अवयवदानाचा जनसामान्यापर्यंत प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचा सूर जागतिक अवयवदान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ’अवयवदान काल, आज आणि उद्या’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रात प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंखे, ऋषिकेश हॉस्पिटलचे संचालक डॉ. भाऊसाहेब मोरे, मृत्यूंजय ऑरगन फांऊडेशनचे संचालक सुनिल देशपांडे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी या चर्चासत्रात सांगितले की, गरजू रुग्णांसाठी अवयवदान हा आशेचा किरण आहे, यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मा. प्रति-कुलपती ना. अमित देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या कोविड-19 आजाराची परिस्थितील लक्षात घेता अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी विद्यापीठाकडून ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्यांमध्ये असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी समाजात प्रबोधन होणे गरजेचे आहे. अवयवदान संदर्भात विद्यापीठातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सामाजिक प्रसार माध्यमातून अवयवदानाची योग्य माहितीचा प्रसार व प्रचार करुन ग्रामीण भागातील लोकांना याचे महत्व पटवणे गरजचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक अवयवदान दिनानिमित्त विद्यापीठातर्फे आयोजित ऑललाईन चर्चासत्राचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील तोरणे यांनी केले.विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रभारी संचालक संदीप कुलकणी यांनी चर्चासत्रात सहभागी मान्यवरांचे आभार मानले. अवयवदान विषयावर यु-टयुब लिंकवरुन प्रसारित करण्यात आलेल्या ऑनलाईन चर्चासत्र शिक्षक, विद्यार्थी व अभ्यागत यांनी मोठया संख्येने पाहिले. हे ऑनलाईन चर्चासत्र यशस्वी करण्याकरीता बाळासाहेब पेंढारकर, सचिन धेंडे, दिप्तेश केदारे,विनायक ढोले,आबाजी शिंदे यांनी परिश्रम घेतले.