नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सोलर प्रकल्प आणि प्रशासकीय इमारतीच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.
‘येत्या २ वर्षात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनही राज्यपालांच्या हस्ते करा’, असं भुजबळांनी म्हणताच राज्यपालांनी यावर ‘उद्धव ठाकरे है ना’ असं उत्तर दिलं. त्याला भुजबळांनी तात्काळ प्रतिसाद देत ‘हम तो रहेंगे ही, मगर आपका नाम बोलने से वजन आता है’, असं सांगत राज्यपालांना प्रत्युत्तर दिलं.
त्यानंतर राज्यपालांनी ‘नाशिकला राजभवन बांधावं, नाशिकची हवा चांगली आहे’, असंही भुजबळ बोलले. त्यावर आपल्या भाषणात बोलतांना राज्यपालांनी भुजबळांचं बोलणं अतिशय उत्स्फूर्त असून त्यांना बोलण्याचा चांगला वकुब आहे. भुजबळांना उत्स्फूर्तपणे बोलण्याची दैवी देणगी लाभलीय, अशी कोपरखळी लगावली. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यपाल आणि भुजबळांमध्ये चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला.
कोनशिलेचे अनावरण
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत नुतनीकरणाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते कोनशिलेचे अनावरण करून संपन्न झाले. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री ना.छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख, कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर, कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर आदी उपस्थित होते.