नाशिक – समाजाचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी तसेच त्याचा विद्यार्थ्यांमध्ये प्रचार व प्रसार व्हावा यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार फिट इंडिया युथ क्लब मोहिमेअंतर्गत विद्यापीठात बुधवार (९ सप्टेंबर) रोजी ’फिट इंडिया फ्रिडम रन’ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे प्र. संचालक संदीप कुलकर्णी आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
माननीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून फिट इंडिया मोहिमेस प्रारंभ करण्यात आला होता. फिटनेस ही आता काळाची गरज आहे. फिट इंडिया चळवळीच्या माध्यमातून आपण निरोगी भारताच्या दिशेने आता पाऊल टाकणे गरजचे आहे. या उपक्रमाचा औपचारिक प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशातील युवावर्ग, विद्यार्थी, तरुण तसेच अन्य वयोगटातील व्यक्तींचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ असण्यासाठी नियमित व्यायम आणि धावणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम समन्वयकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार दि. १५ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध विद्यापीठात ’फिट इंडिया युथ क्लब’ अंतर्गत धावणे, २ ते ३ कि.मी. मॉर्निंग वॉक, ई-पोस्टर कॅम्पेन, सायकलिंग, योगा व अन्य फिजिकल अॅक्टीव्हिटी करणेसंदर्भात कार्यक्रम करणेबाबत निर्देशित करण्यात आले आहे. या अनुषंगाने विद्यापीठात परिसरात ’फिट इंडिया फ्रिडम रन’चे आयोजन करण्यात आले असून विद्यापीठातील मान्यवर व अधिकारी यामध्ये सहभागी होणार आहे.
’फिट इंडिया फ्रिडम रन’ संदर्भात विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयांना विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे. सर्व संलग्नित महाविद्यालयांनी कोव्हिड-१९ संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन निर्देशित करण्यात आलेल्या सूचनांनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.