मुंबई – आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदा टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. शारदाताईंनी ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव टोपे यांना खंबीर साथ दिली. अंकुशराव यांच्या निधनानंतर शारदाताई या कुटुंबीयांच्या आधारस्तंभ होत्या. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण राज्याच्या आरोग्याची काळजी घेत असताना राजेश टोपे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांनी मातोश्रींचीही तितक्याच तन्मयतेने काळजी घेतली. राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर आईच्या निधनामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शारदाताई यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी जालन्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनामुळे अनेक क्षेत्रांतून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.