मुंबई – पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. ही जागा शुन्य रुपये खर्च करून कारशेडसाठी घेण्यात आली आहे, शासनाचा एकही पैसा ही जमीन खरेदी करण्यासाठी खर्च झालेला नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आरे वाचवा मोहिमेत ज्या पर्यावरणवाद्यांनी सहभागी होऊन आंदोलन केले त्या सर्व आंदोलकांवरील गुन्हे शासन मागे घेणार असल्याचेही त्यांनी आज सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, यामध्ये मेट्रो 3 आणि 6 नंबरच्या लाईनचे एकत्रिकरण करण्यात आल्याने जनतेचा एक ही पैसा वाया जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी कांजूरमार्ग येथील ही जमीन शुन्य पैशांमध्ये मेट्रो कारशेडसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याचा आवर्जुन उल्लेख केला.
आरेतील 800 एकर जंगल राखीव घोषित
आरे मधील 800 एकर जागा शासनाने जंगल म्हणून राखीव करण्याचा निर्णय घेतला आहे. असे करतांना तिथे असणाऱ्या आदिवासी पाड्यातील लोकांच्या आणि तबेलांच्या अस्तित्वाला धोका न लावता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेले हे वन शासनाने राखीव जंगल म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत ही इतर कारणासाठी वापरता येईल त्यामुळे त्यासाठी खर्च झालेला निधीही वाया जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपल्या आसपासचे पर्यावरण जपतांना करण्यात आलेले हे काम ऐतिहासिक स्वरूपाचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.