मनाली देवरे, नाशिक
……
बुधवारी झालेल्या सामन्यात विजयासाठी मिळालेले अवघ्या ८४ धावांचे आव्हान रॉयल चॅलेजंर्स बंगलोर संघाने १३.३ षटकात आणि ८ गडी राखून पुर्ण करत कोलकाता नाईट रायडर्स संघावर एकतर्फी मात केली. कमी धावसंख्येवर डाव आटोपल्यावर केकेआरतर्फे चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले जाईल अशी अपेक्षा होती. पण, ती फोल ठरली. देवदत्त पड़ीकल, अॅरॉन फिंच, गुरकीरत मान सिंग आणि विराट कोहली यांनी ही धावसंख्या १४ व्या षटकातच पार केली आणि मोठया फरकासह हा सामना जिंकला. या विजयाने आरसीबीचा संघ दुस–या स्थानावर आला असून केकेआरसाठी मात्र या पराभवाने जमवून आणलेला डाव विस्कटवून लावला आहे. सध्या चौथ्या क्रमांकासाठी प्रचंड स्पर्धा असतांना हे स्थान टिकवून ठेवण्यासाठी केकेआरला उर्वरीत सामन्यात नेटाने खेळावे लागेल.
कोलकात्याचे फलंदाज ढेपाळले
कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी आज मैदानावर हाराकिरीच केली. प्रथम फलंदाजी करतांना २० षटकात ८ गडी गमावून त्यांचा डाव अवघ्या ८४ धावात गुंडाळला गेला. मोहम्मद सिराज आणि कुलदीप सैनी यांच्या मध्यमगती मा–यासमोर एकवेळ केकेआरची अवस्था इतकी वाईट होती की, किमान ५० धावा तरी फलकावर लागतील की नाही अशी शंका वाटत होती. ३ बाद ३ धावा अशा अतिबिकट अवस्थेतून पुढे येतांना कर्णधार इयान मॉर्गनने केलेल्या ३० धावा आणि अगदी तळाचा फलंदाज असलेला लॉकी फर्ग्युसनची १९ धावा, यामुळे किमान ८४ धावांचे आव्हान तरी केकेआरला नोंदविता आले. या डावात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या मोहम्मद सिराजचे कौतुक करावे तेव्हढे थोडे ठरेल. या पठयाने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या ८ धावा देवून ३ महत्वपुर्ण बळी घेतले. त्याच्या १६ चेंडूवर केकेआरच्या फलंदाजांना एकही धाव घेता आली नाही इतकी दहशत त्याच्या गोलंदाजीत होती. केकेआरच्या फलंदाजांवरील या दडपणाचा फायदा घेत यर्जुवेंद्र चहल (४ षटकात १५ धावा २ बळी) आणि वॉशिंग्टन सुंदर (४ षटकात १४ धावा १ बळी) या फिरकी जोडीने देखील मैदानावर केकेआरच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले.
२०१७ चा वचपा काढला
२३ एप्रिल २०१७ रोजी या दोन्ही संघात झालेल्या आयपीएलच्या सामन्यात केकेआरने पहिल्या डावात १३१ धावा केल्या होत्या आणि ही धावसंख्या गाठतांना आरसीबीचा संपुर्ण संघ ४९ धावात बाद झाला होता. क्रिकेटमध्ये इतिहास कधी कधी नव्याने लिहीला जातो हे खरं आहे. या सामन्यात २०१७ च्या त्याच पराभवाचा वचपा काढतांना आरसीबीने थोडयाफार फरकाने नवा इतिहास लिहून काढला.
गुरूवारची लढत
सनरायझर्स हैद्राबादला या सिझनमध्ये आता आणखी पुढे जाण्यासारखे फारसे काहीही राहीलेले दिसून येत नाही. त्यांनी बरेच काही गमावले आहे. राजस्थान रॉयल्सची देखील थोडयाफार फरकाने हीच अवस्था आहे. अशा दोन्ही संघाचा मुकाबला गुरूवारी दुबईत होईल.