मुंबई – शिक्षण हक्क कायदा अर्थात, आरटीई अंतर्गत प्रतिक्षा यादीतल्या बालकांच्या शाळा प्रवेशासाठी आता २३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील ९ हजार ३३१ शाळांनी ‘आरटीई’ प्रवेशासाठी १ लाख १५ हजार ४७७ जागा दर्शवल्या आहेत. या जागांसाठी २ लाख ९१ हजार ३६८ पालकांनी अर्ज केले आहेत.
नियमित प्रवेश फेरीसाठी १ लाख ९२६ जागा उपलब्ध झाल्या होत्या. त्यापैकी ६८ हजार २३६ प्रवेश झाले असून, प्रतीक्षा यादीत ७५ हजार ४६५ बालकांचा समावेश आहे. यापैकी ३१ हजार ४२० जागांवर प्रवेश जाहीर झाले असून, प्रत्यक्षात सुमारे १३ हजार जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत.
रिक्त जागांनुसार पालकांना ‘एसएमएस’द्वारे प्रवेशाचा दिनांक कळवला जाणार आहे. पालकांनी पोर्टलवर प्रवेशाच्या दिनांकाची खात्री करून घ्यावी, शाळेत गर्दी करू नये तसंच मुलांना सोबत आणू नये, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयानं केल्या आहेत.