आपले सौंदर्य वाढविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी आयुर्वेद अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. अनेकांना ही बाब माहित नाही. तीच आज आपण जाणून घेणार आहोत….
सौंदर्य हा एक नैसर्गिक भाव आहे. स्त्रीच्या प्रसन्न व आकर्षक व्यक्तिमत्त्वाची पहिली पायरी म्हणजे तिचे दर्शनी सौंदर्य किंवा आकर्षकता. आजकाल स्त्रियांबरोबरच पुरुष, बाल, वृध्द यांनाही सौंदर्यांची आवड आहे. निसर्गतः मिळालेले सौंदर्य कमी अधिक प्रमाणात असते. काहींची त्वचा नितळ, कांतीमय असते तर काहींचे केस आकर्षक, मऊ व चमकदार असतील, काहीचा बांधा सुडौल असतो तर काहींचे डोळे चमकदार, तेजस्वी असतात, काहींचा चेहरा रेखीव असतो, अशाप्रकारे सौंदर्याची परिभाषा व्यक्तीगणिक बदलते.
काहींना जाड व्यक्ती आवडतात तर काहींना झिरो फिगरची क्रेझ असते. पण या सर्वांबरोबर अत्यंत महत्त्वाचे असते ते निरोगी असणे. एखादी व्यक्ती हायपोथायरॉईड, हॉरमोन्स चे बदल यामुळे स्थुल असेल तर ते नैसर्गिक नाही. तसेच एखादी व्यक्ती मधुमेह, हायपरथायरॉईड, पोषणमुल्यांचा अभाव यामुळे सडपातळ असेल तर ते सौंदर्य आरोग्याला मारक ठरु शकते.
गोरीपान परंतु पांढरीफटक, निस्तेज, डाग असलेली त्वचा असेल तर ते सौंदर्य खुलुन दिसत नाही. याउलट सतेज, रसरशीत, कांतीमान त्वचा असेल तर गव्हाळ किंवा सावळा रंगही खुलुन दिसतो. उदास, रखरखीत, रुक्ष सावळेपणा सौंदर्याला गालबोट लावतो पण टवटवीत, प्रसन्न, स्वच्छ, डागरहित, सतेज, एकसारखा रंग असलेला सावळेपणा मनाला भावतो.
सौंदर्य हे वयाशी जोडलेले असले तरी वाढत्या वयातही तारुण्य व आरोग्य टिकविणे हे आयुर्वेद शास्त्राच्या सहाय्याने सहज शक्य आहे. जन्मजात सौंदर्य जरी सर्वश्रेष्ठ असेल तरी सौंदर्य टिकविणे व खुलवणे यासाठी उत्तम आरोग्याची गरज असते. ब-याच वेळा सौंदर्यात बिघाड आणणा-या समस्या ह्या आरोग्यातील बिघाड दर्शवितात.
आजकाल मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन तात्पुरते सुदंर दिसण्याचा प्रयत्न केला जातो. विविध डाय, क्रिम, लेप, कन्सीलर, रासायनिक सौंदर्य प्रसादने, टमी टकर सारख्या गोष्टी वापरुन दोष झाकण्याचा प्रयत्न केला जातो. पण् त्यामुळे त्या समस्या अधिक गंभीर होत जातात. सौंदर्य समस्याच्या मुळ कारणांचा शोध घेवुन त्या शास्त्रशुध्द पध्दतीने हाताळल्या तर नक्कीच यश मिळते.
कुठलेही सौंदर्य प्रसाधने म्हटले की हर्बल हे विशेषण त्याला जोडुनच येते. सर्व प्रकारच्या जाहीरातींमध्ये हर्बल रेखांकित केले जाते. पण खरोखर ती प्रसाधने हर्बल म्हणजे पुर्णतः नैसर्गिक किंवा शुद्ध आयुर्वेदिक असतात का ? कारण कुठलेही क्रीम, लोशन, डाय इ. रासायनिक बेस किंवा मिश्रण वापरुनच तयार होते. खरोखर या प्रकारच्या प्रसाधनांचा वापर सौंदर्यात भर घालतो का? नक्कीच नाही तर त्यासाठी आयुर्वेद शास्त्रातील निरोगी व स्वस्थ शरीर संकल्पना, नैसर्गिक जीवनशैली, पथ्याहार, शरीर शुद्धीसाठी पंचकर्म उपचार, मुळ समस्या निराकरणासाठी औषधांचे सेवन, रसायन औषधी, योग, व्यायाम, नैसर्गिक प्रसाधनांचा वापर या द्वारे केलेले उपचार अधिक प्रभावी ठरतात.
काही उदाहरणांनी ते आपल्याला समजून घेता येईल
१. मुखदुषिका किंवा पिंपल्स
रक्तातील उष्णता वाढल्यामुळे येणारे फोड, मलावरोधामुळे येणारे पिंपल्स, हॉमोन्स बदलामुळे तरुण वयात येणा-या तारुण्यपिटीका यांवर उपचार करतांना ओघाने औषधे बदलतात. मुळ कारणांवरील उपाय रक्तशुद्धी साठी की मलावरोध दूर करण्यासाठी यामध्येही निश्र्चितच बदल होतो. मुखदुषिकांचे स्वरुप, आकार कसा आहे यानुसारही वमन द्यायचे की फक्त रक्तशुध्दीची औषधे व लेप द्यायचा हा चिकित्सा विचार बदलतो.
२. डोळ्याखालील काळी वर्तुळे
निद्रानाशामुळे , जागरणामुळे येणारी काळी वर्तुळे, रक्ताच्या कमतरतेमुळे किंवा पोषणतत्त्वाच्या अभावामुळे येणारी वर्तुळे, मानसिक तणावामुळे येणारी वर्तुळे, पापण्यांचे केस गळणे, डोळे नेहमी लाल होणे यांची कारणे व उपाय यामध्ये भिन्नता असते. त्याचे योग्य निदान तज्ञ आयुर्वेद चिकित्सकाकडुन करुन त्यानुसार उपाय केल्यास नक्कीच फायदा होतो. जीवनशैलीतील योग्य बदल, आहार, दिनचर्या पालन, मानसिक तणाव कमी करणे इ. द्वारा डोळे सतेज व निरोगी होतात.
३. केस गळणे व पिकणे
वाढत्या वयानुसार केस पिकणे स्वाभाविक आहे परंतु कमी वयातील केसांच्या किंवा त्वचेच्या समस्या अयोग्य आहार – विहारतुनच संभवतात. जसे खारट व आंबट पदार्थाच्या अतीसेवनामुळे देखणेपणा कमी होतो. म्ह्णुनच सौंदर्याला लावण्य म्ह्णजे ज्यात लवण(मीठ किंवा खारटपणा) कमी(उणं) आहे ते लावण्य अस संबोधतात. मग चिप्स, कुरकुरे, सायट्रिक अँसिड वापरुन टिकवलेले पदार्थ,लोणचे असे पदार्थ खावुन केस लवकर पांढरे नाही झाले किंवा कमी वयात सुरुकुत्या आल्या नाहीतर नवलच. रुक्षतेमुळे केस गळत असतील तर शिरोधारा, शिरोभ्यंग, वातशामक औषधांनी फायदा होतो. पित्तप्रकोपामुळे केसांच्या समस्या असतील तर उष्णता कमी करणारी औषधी, आहारातील बदल यांनी फायदा होतो . अस्थिक्षयामुळे केस गळत असतील तर अस्थीपोषक औषधी, तिक्तक्षीर बस्ती यासारख्या उपचारांनी उपशम मिळतो. केस निरोगी राहण्यासाठी नियमित केसांना औषधी तेले लावणे, साबण, शॉम्पु ऐवजी वनस्पती चुर्णांचा वापर केस धुण्यासाठी करावा.
थोडक्यात सौंदर्यातील उणीवा भरुन काढण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदोक्त नैसर्गिक औषधोपचार, पंचकर्म शुद्धीक्रिया, अभ्यंग, सेक, उद्वर्तन, नस्य, पिंडस्वेदन, शिरोधारा, पथ्यकर आहार विहार, आयुर्वेदिक तेले, लेप इ. चा तज्ञ वैद्याच्या सल्ल्यानेच वापर करुन आपले सौंदर्य अबाधित ठेवावे.
शारीरिक सौंदर्याबरोबरच मानसिक ताण कमी असणे, प्रसन्न राहणे, दुस-यांशी योग्य पध्दतीने बोलण्याची सवय, चांगले बोलणे, चांगले वागणे, बुध्दीचातुर्य, दुस-यांना मदत करण्याची प्रवृत्ती, संवेदनशीलता, चेह-यावर योग्य हाव- भाव असणे व, काम करण्यातला उत्साह, वागण्यातली उब, पाठीचा कणा ताठ ठेवणे, खांदे झुकवुन न चालणे, उठणे, बसणे, चालणे आकर्षक असणे, व्यक्तीमत्त्व विकास, आत्मविश्वास, कपड्याचीं निवड, केशरचना इ. गोष्टी सुध्दा आपल्या सौंदर्यात भर घालतात व या सर्व अंगांबद्दलचा सौंदर्य निर्देश आयुर्वेदात योग, सद्वृत्त, ऋतुचर्या, व्यायाम, इ. मध्ये विस्तृत वर्णित आहे.
चला तर मग आपल्या जीवनातील सर्वांगिण सौंदर्य टिकविण्यासाठी आयुर्वेदाची कास धरुया व जीवन सुंदर व निरोगी करुया……
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!