नाशिक – महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती झाली आहे. तसे पत्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढले आहे. जाधव यांना कुंटे यांनी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नाशिक मनपा आयुक्त पदाचा पदभार त्वरीत स्विकारावा. तसेच, सध्याची जबाबदारी महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपवावे, असे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, गमे यांची नेमकी कुठे बदली करण्यात आली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गमे यांचा नाशिकच्या विकासात वाटा
गमे हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी नाशिक मनपा आयुक्त पदाचा कारभार डिसेंबर २०१८ मध्ये स्विकारला होता. त्यांच्या नेतृत्वात महापालिकेची कामगिरी सुधारली आहे. प्रशासनावर त्यांचा वचक आहे. तर, स्मार्ट सिटीसह स्वच्छतेतही नाशिक मनपाची कामगिरी उंचावण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच, ते वादग्रस्त अधिकारी ठरलेले नाहीत. नाशिकचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी ठोस निर्णय घेतले आहेत. त्यांनी नाशिकमध्ये अतिरीक्त जिल्हाधिकारी म्हणूनही कार्यभार पाहिला आहे. तसेच त्यांच्या पत्नी या मूळच्या नाशिकच्याच आहेत. त्यामुळे नाशिकशी त्यांचे ऋणानुबंध आहेत. शिवाय त्यांना येथे कार्यभार करण्याचीही संधी मिळाली. नाशिकच्या विविध क्षेत्रातील अनेक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांचा नाशिकच्या विकासात मोठा वाटा आहे.
जाधव यांचेही नाशिकशी कनेक्शन
कैलास जाधव हे यापूर्वी उपविभागीय अधिकारी, निफाड आणि निवासी उपजिल्हाधिकारी, नाशिक या दोन पदांवर काम केले आहे. त्यामुळे त्यांचाही बराच काळ नाशिकशी संबंध राहिला आहे.