नाशिक – उपनगर पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचा जनता दरबार सुरू असतांनाच नाशिकरोड येथे दुचाकीस्वाराने भरदिवसा पादचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. अण्णा हजारे रोडवर ही घटना घडली आहे. या गुन्ह्यात जखमी झालेल्या व्यक्तीवर बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे गुन्हेगारांनी थेट पोलिस आयुक्तांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन अली मेहबूब अली महम्मद अली (५४, रा अरिंगळे मळा, एकलहरा रोड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. हुसेन अली शनिवारी (दि. ३) हे दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आण्णा हजारे मार्गाने पायी जात असतांना ही घटना घडली. भोले ज्वेलर्स समोरून पायी जात असतांना काही दुचाकींवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हुसेन यास विचारणा केली की, टिप्या कोठे आहे. त्याचा पत्ता सांग, त्याला मोबाईल कर असे म्हणत हल्ला केला. संतप्त टोळक्याने धारदार कोयत्याने हुसेन अली यांच्या नाकावर व हातावर सपासप वार करून पोबारा केला. जखमी अवस्थेत त्यांना बिटको रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, घटना घडली त्याच वेळी पोलीस आयुक्त पाण्डेय यांचा उपनगर पोलीस ठाण्यात जनता दरबार सुरू होता. एकीकडे आयुक्तांचा दरबार तर दुसरीकडे खुनी हल्ला अशी घटना घडली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. या घटनेच्या निमित्ताने नाशिकरोड परिसरातील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. एकप्रकारे गुन्हेगारांनी हे थेट पोलिस आयुक्तांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आयुक्त पाण्डेय हे नाशिकरोडची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी काय पावले उचलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.