जळगाव/मुंबई – जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन जाणाऱा टेम्पो पलटी होऊन त्यात १६ मजूर मृत्यूमुखी पडले. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. या अपघाताची दखल पंतप्रधान कार्यालयानेही घेतली आहे. पंतप्रधान मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
मृत मजूर हे रावेर तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे. मृतांमध्ये सहा महिला व नऊ पुरूष आहेत. हा अपघात दुर्देवी असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मृत मजुरांच्या कुटुंबियाप्रती आपली सहवेदना व्यक्त केली आहे. याशिवाय अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले.
https://twitter.com/PMOIndia/status/1361251765052731393
पपई भरून येणारी आयशर ट्रक यावल तालुक्यातील किनगावजवळ उलटून भीषण अपघात झाला आहे. त्यात १६ मजूर जागीच ठार झाले असून ५ जण गंभीर जखमी आहेत. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी याला दुजोरा दिला आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेर (धुळे) येथून पपईने भरून आयशर रावेरला येत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास किनगाव नजिक मोठा अपघात झाला आहे. आयशर पलटी झाल्याने यात असणारे १६ जण जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. मयत सर्व रावेर तालुक्यातील आभोडा, केर्हाळा व रावेर शहरातील असल्याचे वृत्त आहे. हे सर्व जण मजूर असल्याचे समजते. गाडीत एकूण २१ जण होते. यातील १६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ५ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात नेले आहे. अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह यावल येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आलेली आहेत. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.
https://twitter.com/PMOIndia/status/1361173680756244480