नवी दिल्ली – कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील तैवानच्या आयफोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी विस्ट्रोन कॉर्पोरेशनमध्ये वेतनाच्या मुद्द्यावरून काही कर्मचार्यांनी तोडफोड केल्याने या प्लांटमध्ये ४३७ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षात अशा प्रकारे कंपनीतील कामगारांमुळे झालेले देशातील आतापर्यंतचे मोठे नुकसान असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोलार जिल्ह्यातील कंपनीच्या नरसपुरा मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये सदर कंपनी अॅपल आणि इतर आयटी उत्पादक कंपन्यांसाठी आयफोन तयार करते. वेतनाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी संतप्त कर्मचार्यांकडून तोडफोड आणि लूटमार करण्यात आली. लॉकडाऊन काळात अडचणीत आलेल्या कर्मचाऱ्यांनी इमारत, मौल्यवान उपकरणे, मशीन्स आणि संगणकांचे नुकसान केले. यासंबंधी कंपनीचे कार्यकारी टी.डी. प्रशांत यांनी वेमागल पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कार्यालयीन उपकरणे, मोबाइल फोन, उत्पादन यंत्रणा आणि संबंधित गॅझेटचे सुमारे ४१२.५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, पायाभूत सुविधांचे १० कोटी, कार आणि गोल्फ कारचे ६०० लाख रुपये नुकसान तर स्मार्टफोन आणि इतर गॅझेटचे १.५० कोटी नुकसान झाले किंवा चोरी झाली. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की ५ हजार कंत्राटी मजूर आणि सुमारे २ हजार अज्ञात आरोपींनी प्लांटमध्ये त्रास दिला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १९ संशयितांना अटक केली आहे तर काहींना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, विस्ट्रोन इंडियाचे एमडी सुदीप्टो गुप्ता म्हणाले की, नरसापुरा प्लांटमधील घटनेमुळे कंपनीला मोठा धक्का बसला आहे. आम्ही कायद्याचे पालन करीत आहोत आणि अधिकाऱ्यांना तपासात मदत करीत आहोत. आमच्या कंपनीत सदस्यांची सुरक्षा आणि कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असते. कर्नाटक सरकारने या घटनेवर केवळ टीका केली नाही तर उपद्रव सामील झालेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे.