मनाली देवरे, नाशिक
आयपीएल सिझन २०२१ च्या साखळीत आत्तापर्यन्तचा सर्वात मोठा एकतर्फी झालेला सामना रॉयल चॅलेंजर्सने १० गडी राखून जिंकतांना स्वत:ला गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर नेवून ठेवण्याची आणि राजस्थान रॉयल्सला याच तक्त्यात तळाला नेवून ठेवल्याची दुहेरी किमया साधली.
रॉयल चॅलेंजर्सला पहिल्या दिवसापासून फॉर्म गवसला आहे. परंतु, देवदत्त पडीकलच्या धावा होत नव्हत्या. या सामन्यात माञ शतक ठोकून देवदत्तने आपल्या मागील सिझनमधील कर्तबगारीची ओळख पुन्हा एकदा करुन दिल्याने रॉयल चॅलेंजर्सची फलंदाजी आणखीनच मजबुत झाली आहे.
राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदाच एक चांगली धावसंख्या रचून प्रतिस्पर्धी संघाला एक चांगले आव्हान दिले होते. परंतु रॉयल चॅलेजंर्स बंगलोर या फॉर्मात असलेल्या संघाने राजस्थानचा डाव उधळवून लावला. शिवम दुबेची ४६ धावांची खेळी आणि राहूल तेवतियाची ४० धावांची खेळी राजस्थानच्या गोलंदाजांनी निरुपयोगी ठरवून टाकल्याने या सिझनमध्ये राजस्थान संघाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्सने टॉस जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजी दिली होती. प्रथम फलंदाजी करतांना राजस्थान संघाने २० षटकात ९ बाद १७७ धावा करून एक चांगले लक्ष्य रॉयल चॅलेंजर्सला दिले होते. परंतु, विराट कोहली (४७ चेंडूत ७२ धावा) आणि देवदत्त पडीकल (५२ चेंडूत १०१ धावा) या दोघांनीच नाबाद राहून हे लक्ष्य पुर्ण केल्याने राजस्थानसाठी या सामन्यात विजयाचे स्वप्न खुप दूर राहीले. राजस्थान रॉयल्सने ही जोडी फोडण्यासाठी आपले ६ गोलंदाज या सामन्यात वापरुन बघितले परंतु, काहीही उपयोग झाला नाही.
रॉयल चॅलेंजर्सचा हा सलग चवथा विजय होता. या संघ अजुनतरी साखळीत पराभूत झालेला नाही. त्यात या सामन्यामध्ये ३.३ षटकं टाकायची शिल्लक असतांना आणि एकही गडी बाद झालेला नसतांना हा विजय मिळाल्याने रॉयल चॅलेंजर्सला २ गुणांबरोबरच आपला रनरेट मजबुत करण्याची किमया साध्य करणे शक्य झाले आहे.
शुक्रवार दि. २३ एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
पंजाब किंग्ज वि. मुंबई इंडीयन्स, एम.ए.चिदंबरम स्टेडीअम, चेन्नई