मनाली देवरे, नाशिक
चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२१ च्या साखळीतील राजस्थान रॉयल्सचा आपला तिसरा सामना ४५ धावांनी जिंकून दोन गुणांची कमाई केली. या सामन्याआधी या दोन्ही संघानी आपला पहिला सामना गमावला होता तर दुसरा सामना जिंकला होता हे विशेष. राजस्थानसाठी हा सामना अडचणी निर्माण करणारा ठरणार असला तरी चेन्नईसाठी माञ गुणांबरोबरच संघाचा नेट रनरेट १.१९४ असा मजबुत करणारा ठरला आहे.
राजस्थान रॉयल्सची व्यथा काय सांगावी? १८८ धावांचे आव्हान पेलतांना राजस्थान रॉयल्सची पडझड झाली. एकटया जॉस बटलरचा (४९ धावा) अपवाद सोडला तर राजस्थान संघाच्या कोणत्याच फलंदाजाला चेन्नईच्या गोलंदाजांचा प्रतिकार करता आला नाही. धावफलकावर १०० धावाही लागलेल्या नसतांना राजस्थानचे ७ फलंदाज बाद झालेले होत त्यातच सगळं काही आलं. राजस्थान रॉयल्सकडे कडे गुणवत्ता आहे परंतु, हा संघ दबावाखाली विस्कटून जातोय. कर्णधार म्हणून संजु सॅमसन अपयशी ठरतो आहे. संघाला विजयासाठी प्रेरणा देतांना त्याचा अनुभव कमी पडतो आहे. या पदावर झालेली त्याची निवड चुकली आहे का ? यावर भाष्य करणे कदाचित घाईचे ठरेल. चेन्नईसाठी गोलदाजांपेक्षा सरस ठरली तरी सर रविंद्र जाडेजाची मैदानावरची कामगिरी. या पठयाने ४ झेल घेतले आणि त्यातले बहुतांशी सिमारेषेवर.
चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजीतली चेन्नई एक्सप्रेस या सामन्यातल्या पहिल्या डावात ब–यापैकी रुळावर आली असे म्हणावे लागेल. २० षटकात १८८ धावा ही चेन्नईसाठी चांगलीच कामगिरी म्हणावी लागेल, परंतु त्यासाठी त्यांना ९ बळी गमवावे लागले हे विशेष. चेन्नईतर्फे आज खेळपट़टीवर तसा कुणाचाच जम बसला नाही. परंतु तरीही ६ फलंदाजांनी २० ते ३० च्या आसपास वैयक्तीक धावा केल्याने एक मोठे आव्हान चेन्नईला उभे करता आले. फाफ डुप्लेसीस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी आणि शेवटी अष्टपैलूत्व सिध्द करणारा ब्राव्हो या सगळयांनी आज खारीचा वाटा उचलला. परंतु, साधारण २०–२५ धावांच्या फरकानंतर चेन्नईची एक–एक विकेट पडत गेल्याने २०० धावांचा सहज वाटणारा टप्पा चेन्नईला गाठता आला नाही.
मंगळवार दि. २० एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
मुंबई इंडीयन्स वि दिल्ली कॅपीटल्स, एम.ए.चिदंबरम स्टेडीअम, चेन्नई