मनाली देवरे, नाशिक
आयपीएल सिझन २०२१ मध्ये बुधवारी झालेल्या दोन सामन्यात सनरायझर्स, हैद्राबादने पंजाब किंग्जचा तर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून दिवस गाजवला.
चेन्नई सुपर किंग्जने गतवर्षीच्या सिझनमध्ये गमावलेला लौकीक या सिझनमध्ये परत मिळवायला सुरुवात केली आहे. चेन्नईचा संघ पुन्हा रुळावर येतोय हे दर्शविण्यासाठी लागोपाठच्या तीन सामन्यात संपादन केलेले विजय पुरेसे आहेत. धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाजी बाब अशी की चेन्नईचा हा सलग तिसरा विजय तर होताच परंतु या विजयामुळे चेन्नई गुणतालिकेत टॉपवर जावून पोहोचला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द प्रथम फलंदाजी करतांना चेन्नईने ३ गडी गमावून २२० धावा केल्या. ऋतुराज गायकवाडला या सिझनमध्ये पहिल्यांदा सुर गवसला. त्याने ४२ चेडूंत ६४ धावा केल्या आणि त्याचा सलामीचा साथीदार फाफ–डुप्लेसीस याने नाबाद ९५ धावा करून दिवस गाजवला. कोलकात्याला पहिला बळी मिळाला तेव्हा चेन्नईच्या ११५ झालेल्या होत्या यात सगळं आलं. या धावसंख्येचा पाठलाग करणे टी२० मध्ये अशक्य नसले तरी कठीण नक्कीच मानले जाते. त्यात कोलकात्याची सुरुवात खराब झाली. पहिले ५ फलंदाज अवघ्या २१ धावात बाद होवून परतणे कोलकात्याला महागात पडले. त्यानंतरही १९.१ षटकात कोलकात्याने २०२ धावा केल्या परंतु विजयापासून संघ बराच दुर राहीला. दोन्ही संघाची तुलनात्मक फलंदाजी बघितली तर त्यातल्या गुणवत्तेत फारसा फरक नव्हता. फक्त फरक होता तो इतकाच की, चेन्नईचे सुरुवातीचे फलंदाज अप्रतिम खेळले तर कोलकात्यासाठी मधल्या फळीतल्या फलंदाजांनी तडाखेबंद फलंदाजी केली. दिनेश कार्तीकच्या २४ चेंडूत ४० धावा, आंद्रे रसेलच्या २२ चेंडूत ५४ धावा आणि पॅट कमीन्सच्या २६ चेंडूत ५३ धावा यांनी सामन्यात रंगत आणली खरी, परंतु तात्पुरती. लागोपाठ पडत चाललेल्या विकेटस चेन्नईसाठी विजयाचा मार्ग मोकळा करीत गेल्या आणि अखेरीस चेन्नईने हा सामना ५ चेंडू शिल्लक असतांना १८ धावांनी जिंकला.
सनरायझर्स, हैद्राबादला मिळाला सिझनचा पहिला विजय
पुर्वाश्रमीच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने या सिझनमध्ये आपले नाव पंजाब किंग्ज असे बदलले खरे, परंतु या संघाचे नशिब काही बदलायला तयार नाही. पहिल्या सामन्यातला एकमेव विजयाचा अपवाद सोडला तर सलग तीन पराभव या संघाला सहन करावे लागल्याने या संघाच्या गुणवत्तेविषयी आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, हा तिसरा पराभव त्यांना सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून मिळाला. आपल्याला माहितीच असेल की, सनरायझर्सशी सुरुवात सलग तीन पराभवाने झाली आहे. त्यामुळे अशा संघाकडून पराभव झाल्यानंतर प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्जसाठी आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे हे निश्चीत.
सनरायझर्स विरूध्दच्या सामन्यात पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. परंतु, डेव्हीड वॉर्नरच्या नेत़त्वाखालील सनरायझर्सच्या गोलदाजांनी कर्णधार के.एल.राहूलचा हा निर्णय चुकीचा ठरवला. खास करुन खलील अहमद आणि अभिषेक शर्मा या प्रसिध्दीचे फारसे वलय नसलेल्या गोलंदाजांनी पंजाबचा निम्मा संघ तंबूत पाठवला. मयंक अग्रवाल आणि शाहरुख खान या दोघांची वैयक्तीक धावसंख्या होती २२ आणि तीच सर्वाधिक होती. परिणामी, १२० धावात सर्वबाद झाल्यानंतर सनरायझर्सला विजयापासून रोखून धरणे पंजाबला अवघड गेले. जॉनी बेअरस्टोची नाबाद ६३ धावांची खेळी आणि डेव्हीड वॉर्नरच्या ३७ चेंडून ३७ धावा सनरायझर्ससाठी एक मोठा विजय मिळविण्यासाठी पुरेशा ठरल्या. या विजयाने सनरायझर्सला आपले गुणांचे खाते खोलणे शक्य झाले असले तरी सर्वात महत्वाचे म्हणजे, संघाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आवश्यक असलेला एक विजय त्यांना मिळाला आहे.
बुधवार दि. २२ एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि.वि. राजस्थान रॉयल्स, वानखेडे स्टेडीअम, मुंबई