मनाली देवरे, नाशिक.
आयपीएलच्या साखळीत एक आश्यर्चकारक विजय नोंदवितांना पंजाब किंग्जने मुंबई इंडीयन्स विरुध्दचा सामना ९ गडी राखून जिंकला. पंजाब किंग्जसाठी या सामन्यात टॉस अतिशय महत्वाचा ठरला. कारण टॉस जिंकल्यानंतर मुंबईला फलंदाजी देवून त्यांना कमीतकमी धावसंख्येत गुंडाळण्याचा पंजाब संघाचा प्लॅन होता आणि तो यशस्वी ठरला. १३१ या (अ)समाधानकारक धावसंख्येचा पाठलाग करतांना पंजाब किंग्जतर्फे सलामीच्या के.एल.राहूल आणि मयंक अग्रवाल यांनी चांगली सुरुवात करुन पंजाबसाठी विजयाचे मार्ग मोकळा केला. राहूलची नाबाद ६० धावांची खेळी आणि ३५ चेंडूत ४३ धावा अशी ख्रिस गेलची आश्चर्यकारक संयमी खेळी यामुळे पंजाबला हा विजय मिळविणे फारसे अवघड गेले नाही. बोल्ट, पांडया, बुमरा, चहर, पोलार्ड आणि जयंत यादव हे सगळे मुंबईकर गोलंदाज या सामना हताश होवून खेळले असे म्हणायला हरकत नाही. एकटया मयंक अग्रवालची विकेट काढणे मुंबईच्या या गोलदांजाना शक्य झाल्यामुळे गतविजेत्या मुंबई इंडीयन्सचा ५ सामन्यात तिसरा पराभव बघायला मिळाला.
या आयपीएलमध्ये चेन्नईच्या खेळपट़ीवर मुंबई इंडीयन्सच्या फलंदाजीचा कस लागतोय. गुरुवारी झालेल्या सामन्यापुर्वी मुंबई इंडीयन्स चेन्नईच्या एम.ए. चिंदबरम स्टेडीअमवर या सिझनमध्ये आपले चार सामने खेळला होता. त्यात या संघाचा दोन सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभव झाला होता. जे दोन पराभव झाले त्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात फलंदाजी केली होती. याच सुञाचा आधार घेवून पंजाब किंग्जने टॉस जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. ही खेळी उपयोगी देखील ठरली होती. मुंबईला २० षटकात अवघ्या १३१ धावा करता आल्या. मुंबईचा हीटमॅन रोहीत शर्माने त्याचे सातत्य पुढे सुरू ठेवत ६३ धावांची एक जबाबदार खेळी केल्याने किमान ही धावसंख्या तरी मुंबईला नोंदविता आली. अन्यथा त्याच्याशिवाय सुर्यकूमार यादवचा ३३ धावांचा अपवाद वगळता मुंबईचे सर्व फलंदाज या खेळपटटीवर अपयशी ठरले. पंजाब किंग्जतर्फे दिपक हुडा, मोहम्मद शमी आणि हेनरीक या तीन गोलदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आणि त्यांच्या १० षटकात फक्त ४८ धावा देवून ३ महत्वाचे बळी सुध्दा घेतले. या तिघांनी गोलंदाजीत ही किमया साधल्यानेच २० षटकात मुंबईला फक्त १३१ धावा करता आल्या.
शनिवार दि. २४ एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, वानखेडे स्टेडीअम, मुंबई