मनाली देवरे, नाशिक
…..
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने गतविजेत्या मुंबई इंडीयन्सचा आयपीएल–२०२१ स्पर्धेच्या सलामीच्या साखळी सामन्यात शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक पराभव करून यावर्षीच्या विजेतेपदाची समीकरणे मागच्या वर्षीपेक्षा वेगळी असतील, याची जाणिव करून दिली आहे. मुंबईच्या १५९ धावांचा पाठलाग करतांना आरसीबी संघाला मुंबईच्या गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक चांगलेच झटके दिले आणि अखेरीस आरसीबीने डावाच्या शेवटच्या चेडूंवर विजयी धाव घेवून सामना जिंकला.
खरेतर प्रथम फलंदाजी करतांना मुंबईचा कर्णधार रोहीत शर्मा सामन्याच्या चवथ्या षटकातंच धावबाद झाल्याने संघाला मोठा धक्का बसला होता. परंतु, अखेरच्या क्रमांकापर्यन्त फलंदाजी करण्याची क्षमता या संघात आहे. मागच्या सिझनमध्ये विजेतेपद गाठतांना मुंबईला हीच ताकद उपयोगी पडली होती. आजही तेच झाले. रोहीत (१९), ख्रिस लीन (४९), सुर्यकूमार (३१) आणि इशान किशन (२८) यांच्या कामगिरीमुळे २० षटकात मुंबईने ९ बाद १५९ धावांचे एक चांगले आव्हान आरसीबीला दिले होते. या सामन्यात आयपीएल मधला आपला ४९ वा सामना खेळत असलेल्या हर्शल पटेलने ४ षटकात अवघ्या २७ धावा देवून ५ बळी घेत मुंबईला डावाच्या शेवटी चांगलेच तडाखे दिले. खास करून अखेरच्या षटकात पटेलने ३ बळी घेवून अवघी १ धाव दिल्याने मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
धावसंख्येचा पाठलाग करतांना आरसीबीची सुरूवात दमदार झाली होती. परंतु, खासकरून विराट कोहली ३३ धावांवर बाद झाल्यानंतर आरसीबीचा डाव सावरणे मुश्कील होते की काय, अशी शंका निर्माण झाली होती. परतु, त्यानंतर मागच्या मोसमातचा अपयशी फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या ३९ धावा आणि अखेरीस ए.बी.डिव्हीलीयर्सने केलेली मॅच विनींग खेळी (४८ धावा) या जोरावर आरसीबीने आपली सुरूवात विजयाने केली आहे;
२०२१ च्या आयपीएल स्पर्धेचा बिगुल आज अखेर वाजला. चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडीअमवर आज हा पहिला सामना खेळला गेला. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ही स्पर्धा यावर्षी देखील पुन्हा एकदा अंधातरी टांगली गेली होती. परंतु, प्रेक्षकांना प्रत्यक्ष मैदानात येण्याची परवानगी न देण्याच्या सशर्त अटीवर आता ही स्पर्धा पार पडणार आहे. यात प्रेक्षकांना ‘लाईव्ह‘ सामन्यांची मजा लुटण्याची संधी उपलब्ध असल्याने, निदान या निमीत्ताने का होईना क्रिकेटचे चाहते घरात बसतील आणि कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास हातभार लावतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
शनिवार दि. १० एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
चेन्नई सुपर किंग्ज वि. दिल्ली कॅपीटल्स, वानखेडे स्टेडीअम, मुंबई