मनाली देवरे, नाशिक
आयपीएल स्पर्धेत आजचा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबईच्या मैदानावर खेळवला जाईल. सीएसके संघ या स्पर्धेत विजेतेपदाच्या शर्यतीत पुढे असला तरी अटीतटीच्या सामन्यात ज्या पद्धतीने दिल्ली कॅपिटल्सने पंजाबचा पराभव केला होता, तो सामना विसरून चालणार नाही. सीएसकेची फलंदाजी मजबूत असली तरी दोन डावात डुप्लेसीस आणि अंबाती रायडू यांचा अपवाद सोडला तर कोणत्याही फलंदाजाला किमान २५ धावांची सरासरी अद्याप गाठता आलेली नाही. याउलट दिल्लीच्या संघातील मार्कस स्टोइनिस, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे चमत्कार करणारे फलंदाज आहेत आणि त्यांना कमी लेखून चालणार नाही.
गुरुवारच्या सामन्यात कोहलीने सोडलेले दोन झेल पडले महागात
पहिल्या सामन्यात पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आज आपला सगळा संताप रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध काढला. हा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबने १७ व्या षटकामध्येच ९७ धावांनी जिंकला. के.एल.राहुलची शानदार शतकी खेळी आणि विराट कोहलीने त्याचे सोडलेले दोन सोपे झेल एवढ्या दोनच गोष्टी आजच्या सामन्यात वैशिष्ट्यपूर्ण आणि सामन्याला कलाटणी देणा-या ठरल्या.
किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेले २०६ धावांचे मोठे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात राॕयल चॕलेंजर्स, बंगलोर संघाची पुरती दमछाक झाली. त्यांचा संपूर्ण डाव १७ षटकामध्येच अवघ्या १०९ धावांवर आटोपला. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, एराॕन फिंच, वॉशिंग्टन सुंदर असे आरसीबी तगडे पहीलवान आज सपशेल फेल झाले. रवी बिश्नोई, मोहम्मद सामी, शेल्डन आणि मुरुगन अश्विन या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांनी आज आरसीबीची पळता भुई थोडी केली.
के.एल.राहुलची खमंग फंलदाजी
आज प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाब तर्फे धावा अक्षरशः कुटून काढण्यात आल्या. के. एल. राहुल हा फलंदाज आयपीएल मध्ये सातत्याने चांगली फलंदाजी करत आला आहे. मागच्या तीन सिझनची त्याची सरासरी ५० च्या आसपास आहे. आज त्याच्या फलंदाजीत खास पंजाबी दाल तडक्याचा स्वाद होता. सुरुवातीला त्याने मंद गॕसवर दाळ शिजवावी तशा ४० चेडुंत ५३ धावा केल्या. नंतर तव्यावर खमंग फोडणी द्यावी तसे त्याने त्याचे तडाखेबंद शतक अवघ्या ६२ धावात पुर्ण केले आणि कुकरची शिट्टी वाजावी तशी डाव संपतांना अवघ्या ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा करुन तो पॕव्हेलियनमध्ये परतला होता. कुठल्याही भारतीय फलंदाजाने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रचलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली.