—————
ड्रीम इलेव्हन आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात निर्धारीत षटकात दोन्ही संघाची धावसंख्या समान झाल्याने त्यानंतर उत्कंठा वाढविणा-या “सुपर ओव्हर” मध्ये माञ दिल्ली कॕपीटल संघाने हा सामना अगदी सहजपणे जिंकला. रबाडाने सुपर ओव्हरमध्ये २ बळी घेवून प्रतिस्पर्धी संघाला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही.
आत्ता कुठे ही स्पर्धा सुरु झाली आहे. परंतु अगदी दुसऱ्याच सामन्याचा निकाल सुपर ओव्हरच्या आधारे लागल्याने येत्या काही सामन्यात अगदी शेवटच्या चेंडूपर्यंतचा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळतो की काय, अशी शक्यता आता वाटायला लागली आहे.
आपल्या संघाचा पराभव समोर दिसत असताना देखील शांत संयमी आणि आवश्यकता असेल तेव्हाच फटकेबाजी करून सामना कसा खेचून आणता येतो याचे उदाहरण आज मयंक अग्रवालने दाखवून दिले होते. मयंक अग्रवालच्या संयमी फलंदाजीमुळे (५९ चेंडूत ८५ धावा) किंग्ज इलेव्हन पंजाब संघ या सामन्यात विजयाच्या जवळ जावून पोहोचला होता. परंतु त्याची ही एकहाती लढत केवळ एका धावेने कमी पडली आणि नंतर दिल्ली कॕपीटल संघाने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारुन नेली.
त्याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाची १७ व्या षटकाच्या सुरुवातीला केवळ ९६ धावा इतकी माफक धावसंख्या होती. त्यामुळे हा सामना ‘लो स्कोरिंग गेम’ होईल असे सुरुवातीलाच वाटत असताना मार्कस स्टोयनीस या खेळाडूने २१ चेंडूत ५३ धावा करून १५७ धावांचे मजबूत आव्हान किंग्ज इलेव्हन पंजाब संघासमोर ठेवले होते. स्टोइनिसने क्रिस जॉर्डनला अखेरच्या षटकात अक्षरशः फोडून काढले. मोहम्मद शामीने या सामन्यात कसोटी क्रिकेटलाही लाजवेल अशी गोलंदाजी केली होती परंतु आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
सामना क्र.३
सोमवार (दि.२१.०९.२०२०) रोजी सनरायझर्स हैद्राबाद वि. राॕयल चॕलेजंर्स, बंगलोर संघादरम्यान संध्याकाळी ७.३० वाजता दुबई इंटरनॅशनल स्टेडीअम, दुबई येथे खेळवला जाईल.









