मनाली देवरे, नाशिक
…….
आयपीएल सिझनच्या पहिल्या टप्यात दोन्ही संघांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेला सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने किंग्स इलेव्हन पंजाबचा ४८ धावांनी मोठा पराभव केला. मुंबईच्या १९१ धावांचा पाठलाग करतांना पंजाबचा डाव १४३ धावातच आटोपला.
आयपीएल मध्ये आजच्या सामन्याची सुत्र ‘राहूल’ या नावाभोवतीच घुटमळत राहीली. पंजाबच्या के.एल.राहूलला आज सूर गवसलाच नाही तर मुंबईचा फिरकीपटू ‘राहूल’ चहरने मात्र टप्यावर गोलंदाजी करुन अवघ्या २६ धावा देत पंजाबचे २ महत्वपुर्ण बळी घेतले.
रग्गड पैसे मोजून किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी विकत घेतलेला ग्लेन मॅक्सवेल या सिझनमध्ये अजुनही फाॕर्मात आलेला नाही. त्यामुळे के.एल.राहूल, मयंक अगरवाल, निकोलस पुरन हे भरवशाचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर मधल्या फळीत त्याला आजही जबाबदारीने फंलदाजी करता आलीच नाही आणि मग मुंबई इंडीयन्स संघासाठी आजचा विजय सुकर झाला.
रो-हीट मॕन फाॕर्मात
हीट मॕन रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचा कणा आहे. तो खेळला तर त्याचा संघ ताकदीने उभा रहातो. आज डीकॉक आणि सूर्यकुमार यांनी आपली विकेट लवकर भेटल्यानंतर कणखरपणे उभा राहिला तो रोहित शर्माच. ७० धावांमध्ये ३ षटकार आणि ८ चौकार. रोहीतने पुन्हा एक लाजवाब खेळी केली.
पोलार्ड-पांड्याची फटकेबाजी
मोहम्मद शामीच्या १७ व्या षटकाच्या सुरुवातीलाच मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. एक सेट झालेला हार्ड हिटर फलंदाज बाद झाल्याने पंजाबच्या खेळाडूंना खरेतर प्रचंड आनंद झाला होता. परंतु हा आनंद, पोलार्ड आणि हार्दीक पांड्या या जोडीने फार काळ टिकूच दिला नाही. या जोडगोळीने मोहम्मद शामी आणि कृष्णप्पा गौथम यांच्या ३.५ षटकात ६७ धावा करुन या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई गेली.
शुक्रवारचा सामना
सध्या पॉइंट्स टेबल मध्ये सगळ्यात खाली, म्हणजे अनुक्रमे ७ व्या आणि ८ व्या क्रमांकावर असलेले सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुबईतल्या मैदानावर सामना होईल.