मनाली देवरे, नाशिक
कोलकाता नाईट रायडर्स संघाने सनरायझर्स हैद्राबादचा १० धावांनी मोठा पराभव करून २ महत्वपुर्ण गुणांची कमाई केली आणि आपले विजयाचे खाते देखील उघडले आहे.
१८७ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सलामीच्या जोडीचे अपयश सनरायझर्स साठी या सामन्यात मोठा झटका ठरला. व्रध्दीमान साहा आणि डेव्हीड वॉर्नर यांना दुहेरी धावसंख्या देखील नोंदविता आली नाही. सनरायझर्ससाठी या दोघांपैकी कुणातरी एका फलंदाजाचे जास्तीत जास्त वेळ क्रिझवर थांबणे आवश्यक होते. परंतु, हे दोन्ही भरवशाचे फलंदाज बाद झाल्याने नंतर चांगला प्रयत्न करून सुध्दा सामना जिंकण्याइतपत त्यांना मजल मारता आली नाही. मधल्या फळीत मनीष पांडे याने केलेल्या ६१ धावा आणि जॉनी बेअरस्टोच्या ५५ धावा चांगली लढत देवू शकल्या परंतु, पराभव वाचवू शकल्या नाहीत. वॉर्नर नावाच्या फलदाजीचा तडका सनरायझर्सच्या डावात टिकला असता तर हैद्राबादी बिर्याणी नक्कीच शिजली असती असे म्हणायला हरकत नाही. परंतु, केकेआरच्या प्रसिध्द क्रिष्णाने आज उत्तम गोलंदाजी करत केकेआरला २ विजयी गुण मिळवून दिले.
सनरायझर्स हैद्राबादने टॉस जिंकून कोलकाता नाईट रायडर्सरायडर्सला प्रथम फलंदाजी सोपवली होती. कोलकात्यासाठी दिवस गाजवला तो नितीश राणा या सलामीच्या धडाकेबाज फलंदाजाने. शुभमन गिलच्या साथीने त्याने अर्धशतकी सलामी दिल्यानंतर कोलकात्याचा डाव चांगलाच रंगला. भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन किंवा रशिद खान यांच्यासारख्या गोलंदाजाना या सामन्यात लय सापडली नाही आणि नितीश राणा (३६ धावा), राहुल ञीपाठी (२९ चेंडूत ५३ धावा) आणि डावाच्या अखेरच्या काही षटकात फलंदाजीसाठी आलेल्या दिनेश कार्तीकने अवघ्या ९ चेडूंत काढलेल्या २२ धावा यांच्या आधारे केकेआरने २० षटकात विजयासाठी १८८ धावांचे एक तगडे आव्हान हैद्राबाद संघापुढे ठेवले होते.
या सिझनचा हा तिसरा परंतु दोन्ही संघासाठी असलेला हा पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर खेळला गेला. २०१६ साली एकदाच आयपीएल चॅम्पीअनशीपचा किताब पटकावणा–या हैद्राबाद संघाची कामगिरी ही संपुर्ण आयपीएलच्या इतिहासात कायम अनिश्चीततेची ठरली आहे. दर्जा असुनही विजेतेपदाची अवघड शर्यत गाठतांना कुठेतरी महत्वाच्या सामन्यात या संघाची दमछाक होते. हुलकावणी देणारे विजेतेपद आता यावर्षी तरी हैद्राबादला मिळेल का?, तर्रेबाज हैद्राबादी बिर्याणी बनविण्यासाठी आवश्यक असलेले सगळे घटक या संघात आहेत. डेव्हीड वॉर्नरच्या कप्तानपदाखालील या संघाला यावर्षी तरी उलटफेर करतांना नशिब साथ देईल का ? या प्रश्नांची उत्तरं मनोरंजक ठरणार आहेत. दुसरीकडे शाहरुखभाईचा केकेआर संघ म्हणजे तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा संघ आहे. या संघाचे कर्णधारपद इयान मॉर्गनसारख्या अनुभवी खेळाडूकडे आहे. चांगल्या सलामी जोडीचा प्रश्न यासंघासाठी या सिझनमध्ये सुटला तर केकेआर कोणत्याही संघावर भारी पडू शकतो यात दुमत नाही. पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. तिथे सत्ता कुणाची? याचे उत्तर २ मे रोजी मिळूनही जाईल, परंतु कोलकात्याची केकेआर टीम आयपीएलच्या या हंगामात “खेला होबे” करते की आणखी काय ? याचा निकाल बघायला मे महिन्याच्या उत्तरार्धात मिळेल हे नक्की.
सोमवार दि. १२ एप्रिल २०२१ रोजी होणारा सामना –
राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्ज, वानखेडे स्टेडीअम, मुंबई