मनाली देवरे, नाशिक
……
सनरायझर्स, हैद्राबाद संघाला आयपीएलच्या प्ले–ऑफ पोहोचण्याची संधी केवळ ७ टक्के असतांना अशा “कमजोर” संघाने दिल्ली कॅपीटल्स सारख्या मजबुत संघाचा ८८ धावांनी दारून पराभव करून धमाका उडवून दिला.
या विजयाचा फायदा सनरायझर्स हैद्राबाद संघाला प्ले–ऑफ मध्ये पोहोचविणार की नाही, याचे उत्तर जरी अदयाप गुलदस्त्यात असले तरी, या विजयाने मात्र सनरायझर्सचे आव्हान अदयाप जिंवत ठेवायला मदत केली आहे हे निश्चीत. या सामन्याच्या निकालानंतर दिल्लीचा संघ दुस–या क्रमांकावरून तिस–या क्रमांकावर घसरला तर सनरायझर्सला माञ सातव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर बढती मिळाली. आता यानंतर कदाचित, उर्वरीत २ सामन्यात सनरायझर्सने मोठे विजय मिळवलेच, तर हैद्राबादी बिर्याणीचा खंमग तडका संघाच्या चाहत्यांना अनुभवायला मिळू शकतो.
दिल्ली कॅपीटल्सचा उलटफेर
क्रिकेट हा अनिश्चीततेचा खेळ आहे असे नेहमी म्हटले जाते. त्यात तथ्य आहेच, याचा पुरावा बुधवारच्या सामन्यानंतर पुन्हा एकदा मिळाला. जो दिल्ली कॅपीटल्सचा संघ यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या पुर्वार्धात सलग विजय मिळवित होता त्या दिल्ली कॅपीटल्सला स्पर्धेच्या उत्तरार्धात माञ सलग तीन पराभव पत्करावे लागले आहेत. केवळ एक विजय मिळाला तरी दिल्लीचा प्ले ऑफ फेरीतील प्रवेश १६ गुणांसह निश्चीत होणार आहे. परंतु, ही जरी वस्तुस्थिती असली तरी ही संधी मागच्या तीन सामन्यात दिल्लीला मिळून देखील त्यांना ती घेता आलेली नसल्याने आता “उलटफेर” नावाचा फॅक्टर यापुढे स्पर्धेत आणखी रंगत वाढतवणार हे निश्चीतपणे दिसून येवू लागले आहे.
वॉर्नरची वॉर्नींग
बुधवारी झालेल्या सनरायझर्स हैद्राबाद संघाने प्रथम फलंदाजी करतांना दिल्ली कॅपीटल्सच्या गोलंदाजीचा कणा मोडला. डेव्हीड वॉर्नर आणि वृध्दीमान साहा या सलामीच्या जोडीनेच दिल्लीची फरफट केली. वॉर्नरच्या ३४ चेंडूत ६६ धावा आणि साहाची ४५ चेंडूतली ८७ धावांची घणाघाती खेळी यामुळे हैद्राबादला २०० धावांचा टप्पा ओलांडने सहज शक्य झाले. अॅास्ट्रेलिया दो–यासाठी भारतीय संघात निवडल्या गेलेल्या मनीष पांडेने देखील ४१ धावांचे महत्वपूर्ण योगदान देवून संघाला २१९ धावांवर नेवून पोहाचविले.
या धावसंख्येचा पिच्छा करायला उतरलेला दिल्ली कॅपीटल्स संघाची या सामन्यात सक्षम वाटलाच दिसली नाही. पहिल्याच चेंडूवर शिखर धवन बाद झाल्यानंतर तर जणू या संघाने जिंकण्याच्या सर्व आशा अपेक्षा सोडून दिल्यागत फलंदाजी केली. ५५ धावा होईपर्यन्त धवन, स्टॉयनीस, हेटमायर आणि अजिंक्य रहाणे यांच्यासारखे महत्वाचे ४ फलंदाज तंबुत परतलेले होते. कर्णधार डेव्हीड वॉर्नरने या सामन्यात गोलंदाजीत वारंवार बदल करून दिल्लीवरचा दबाब आणखी वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याने या सामन्यात ८ गोलंदाज वापरून बघितले हे विशेष.
गुरूवारची लढत
आयपीएलचा निर्णायक टप्पा आता सुरू होतो आहे. सध्या येत असलेले आर्श्चकारक निकाल बघितल्यानंतर नंबर वन मुंबई इंडियन्स संघाला प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरूध्द गुरूवारी अबुधाबीत जिंकावे लागेल.