मनाली देवरे, नाशिक
…..
मुंबई इडीयन्सने रॉयल चॅलेजर्स बंगलोरचा ५ गडी राखून दणदणीत पराभव केला. या विजयानंतर १२ सामन्यात १६ गुण मिळवून आता आयपीएल २०२० च्या प्ले ऑफ फेरीत पोहोचणाचे त्यांचे स्वप्न पुर्णत्वास येवू घातले आहे. या दोन्ही संघातला पहिला साखळी सामना सुपर ओव्हरमध्ये जावून संपला होता व त्यात आरसीबीला विजय मिळाला होता. मुंबई इंडीयन्सने बुधवारच्या सामन्यात याचाच वचपा काढतांना रोहीत शर्माच्या अनुपस्थितीत आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदविली.
सुर्यकुमारचा संयमी आणि तडाखेबाज खेळ
आरसीबीने केलेल्या १६४ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या धावांचे अर्धशतक फलकावर झळकतांना त्यांना २ बळी गमवावे लागले होते. रोहीत शर्मा सारखा अतिशय महत्वाचा फलंदाज संघात नाही म्हटल्यानंतर मुंबई संघाच्या कामगिरीचे संतुलन ढासळणे सहाजिक होते. परंतु, इशान किशनने सुरूवातीला संघाची नौका थोडीफार सावरल्यानंतर मधल्या फळीत सुर्यकुमार यादवने खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी केली. सुर्यकुमारने रोहीतची उणीव भासू दिली नाही. ४३ चेंडूत त्याची नाबाद ७९ धावांची खेळी मुंबई इंडीयन्सच्या विजयाचा शिल्पकार ठरली. पांडया ब्रदर्स मुंबई संघातले विस्फोटक अस्ञ आहेत. त्यापैकी कुणाल पांडया लवकर बाद झाल्यानंतर हार्दीक पांडयाने जबाबदारीने खेळ केला आणि संघाला विजय मिळवून दिला.
आरसीबीची गोलंदाजी आज निष्प्रभ ठरली. नवदीप सैनी अनफिट असल्याने डेल स्टेनला संधी मिळाली होती. या अनुभवी गोलंदाजाचा उपयोग संघाला झालाच नाही. या षटकात विकेट मिळाली असती तर सामन्याचे भवितव्य बदलता आले असते. परंतु, त्याने या षटकात विकेट घेण्याएैवजी धावा रोखणारे वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला आणि ३ वाईड धावांच्या मदतीने या षटकात मुंबईला ११ महत्वपुर्ण धावा मिळाल्या.
आरसीबीची पिछेहाट
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून आरसीबीला फलंदाजीसाठी आमंञित करण्याचा निर्णय घेतला. २० षटकात आरसीबीला ६ बाद १६४ धावा करता आल्या. एकवेळ अशी होती की आरसीबी २०० च्या आसपास धावा जमवणार अशी शक्यता वाटत होती. १३१ या धावसंख्येवर त्यांचा तिसरा महत्वाचा बळी ए.बी.डिव्हीलीयर्स तंबुत परतला आणि तिथून आरसीबीची घसरण सुरू झाली. मधल्या फळीत अवघ्या ७ धावांच्या अंतराने ३ फलंदाज बाद झाल्यानंतर संघाची धावगती मंदावली आणि जिथे १९० ते २०० धावा अपेक्षीत होत्या तिथे फक्त १६४ धावा फलकावर झळकल्या. अखेरच्या ३ षटकात डगआउटमध्ये बसलेल्या कर्णधार विराट कोहलीची देहबोली पुरेशी बोलकी दिसत होती. तो अस्वस्थ दिसत होता. जसप्रीत बुमरा आणि बोल्ट यांच्या मा–यासमोर अखेरच्या ३–४ षटकात मंदावलेली धावगती नंतर किती तापदायक ठरू शकते हाच विचार त्याची डोकेदुखी वाढवीत होता.
मुंबईचा कर्णधार कायरन पोलॉर्ड गोलंदाजी बदलाचा वापर योग्य रितीने करून घेतो असा अनुभव आला आहे. १५ वे षटक त्याने स्वतः टाकले आणि त्यात डिव्हीलीयर्सचा अडथळा दुर करून उरलेल्या ४ षटकांची जबाबदारी जसप्रीत बुमरा आणि बोल्ट यांच्या वर टाकली. बुमराचा यॉर्कर आणि तो देखील अखेरच्या काही षटकात बघणं म्हणजे पर्वणी असते. बुमराने आज आयपीएलमध्ये आपले १०० बळी पुर्ण केले. योगायोगाची बाब म्हणजे त्याचा पहिला आणि शंभरावा बळी होता विराट कोहली. १६ व्या षटकात पहिले शिवम दुबे आणि त्यांनतर सेट झालेला देवदत्त पडीकल (७४ धावा) बुमराने मैदानाबाहेर पाठवून मॅचचा टर्निंग पॉईन्ट निश्चीत केला आणि बोल्टने त्यानंतर परिस्थीतीचा फायदा घेवून मॉरीसची विकेट घेतली.
गुरूवारची लढत
चेन्नई सुपर किंग्ज वि कोलकाता नाईट रायडर्स ही लढत शुक्रवारी दुबईत खेळवली जाईल. केकेआरला या सामन्यातल्या विजयानंतर मिळणारे २ गुण अत्यंत महत्वाचे आहेत. चेन्नईचे आव्हान या सिझनपुरते संपुष्टात आले आहे त्यामुळे कोणताही दबाव या सामन्यात चेन्नई संघावर नसेल. याउलट, स्वतःला क्वालिफाय करण्यासाठी ज्या अनेक शक्यता आहेत त्यापैकी महत्वाची एक म्हणजे, हा सामना कुठल्याही परिस्थीतीत जिंकण्याचा दबाब केकेआर संघावर असेल. महेंद्रसिंग धोनीला या सामन्यातून फारसे काही सिध्द करायचे शिल्लक राहीलेले नसल्याने कदाचित काही नविन खेळाडूंना तो या सामन्यात हमखास संधी देईल. त्यामुळे, नव्या दमाचे खेळाडू मायदेशी परत येण्यापुर्वी स्वतःला सिध्द करण्याचा देखील नक्कीच प्रयत्न करतील. अशा परिस्थितीत सामना एकतर्फी होणार नाही हे निश्चीत.