मनाली देवरे, नाशिक
………
ड्रीम इलेव्हन इंडियन प्रिमिअर लीग स्पर्धेसाठी रविवारचा दिवस आतापर्यंतचा सगळ्यात मोठा दिवस ठरला. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा ५ गडी राखून पराभव करताना सामन्यात चुरस निर्माण केली तर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातल्या सामन्यात मुंबईने देखील ५ गडी राखून बाजी मारली. आजच्या दोन्ही सामन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे जिंकणाऱ्या संघाने हे सामने ५ गडी राखून जिंकले आहेत.
२० षटकात १६३ धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सला पहिला फटका बसला तो रोहित शर्माची विकेट पडल्यामुळे. १५० वा आयपीएल सामना खेळणारा रोहित लवकर बाद झाला खरा परंतु, क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरला. दोघांनी व्यक्तिगत ५३ ही धावसंख्या गाठताना संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवले. मग उरलंसुरलं काम करतांना ईशान किशन, कुणाल पांड्या आणि पोलाॕर्ड यांनी विजयाचा मार्ग मोकळा केला.
देशाची राजधानी अशी ओळख असलेल्या दिल्लीचे प्रतिनिधित्व करणारी ‘दिल्ली कॅपिटल्स’ आणि देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईचे प्रतिनिधित्व करणारी ‘मुंबई इंडियन्स’ यांच्यातल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आज फिटनेसच्या कारणामुळे संघात नसलेल्या ऋषभ पंतच्या जागेवर अजिंक्य रहाणेला संधी मिळाली खरी, परंतु त्याला सुर गवसला नाही. आज खेळला तो गब्बर. दिल्ली तर्फे नवीन खेळाडू चांगले खेळत असताना शिखर धवनची कामगिरी होत नसल्यामुळे तक्रारी वाढल्या होत्या. परंतु, शिखर धवनने ५२ चेंडूंत ६९ धावांची एक महत्त्वाची खेळी करून मुंबईसमोर १६३ धावांचे आव्हान ठेवतांना महत्त्वाची खेळी केली. श्रेयस अय्यरने (४२) धवनला महत्त्वाची साथ दिली. आज मुंबईतर्फे गोलंदाजी करताना कुणाल पांड्या, कुणाल पांड्या जसप्रीत बुमरा आणि ट्रेंट बोल्ट यांच्या गोलंदाजीचे विश्लेषण वाखाणण्याजोगे होते. परंतु, जेम्स पॅटिन्सन दिल्लीकर फलंदाजाच्या ताब्यात सापडला आणि त्याच्या ३ षटकात ३७ धावा निघाल्याने तो महागडा ठरला.
राजस्थान राॕयल्स जिंकली
राजस्थान रॉयल्स ने आज धावांचा पाठलाग करताना आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. १५८ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान रॉयल्सची अवस्था एक वेळ ५ बाद ७८ होती. सामना हातच जाईल की काय ? असे वाटत असतानाच रियान पराग (४२) आणि राहुल तेवतिया (४५) या दोन तरुण भारतीय खेळाडूंनी राजस्थान रॉयल्सतर्फे घणाघाती फलंदाजी केली आणि या संघाला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एक महत्त्वाचा मिळवून दिला. या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद तर्फे डेव्हीड वॉर्नर (४८) आणि मनीष पांडे (५४) यांच्या जोरावर १५८ धावांचे आव्हान राजस्थान रॉयल्सला दिले होते.
आजचा सामना होता २७ वा. साखळीतले निम्मे सामने आता संपले असून उर्वरित सामन्यांमध्ये पहिल्या चार संघांत येण्याची धडपड, चुरस, स्पर्धा आणि महत्वकांक्षा दिसणार असल्याने सामन्यांना मजा येणार आहे हे निश्चित.
सोमवारचा सामना
सोमवारचा दिवस आणखी एक महत्त्वाचा दिवस आहे. क्रमांक ३ आणि ४ वर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यामध्ये सध्या, आहे ते स्थान आणखी पक्के करण्यासाठी चुरस सुरु आहे. सहाजिकच, शारजाह मैदानावर या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ सर्वस्व पणाला लावतील.