चेन्नई – इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचे सर्व सामने यंदा मुंबईत खेळवले जाण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआय आणि आयपीएलच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. गुरुवारी आयपीएलच्या या नवीन सीझनच्या मिनी ऑक्शनचे आयोजन चेन्नई येथे करण्यात आले आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पर्थ जिंदल यांनी सांगितले की, इथे आल्यावर मी जी काही चर्चा ऐकली आहे, त्यानुसार आयपीएलचे सगळे सामने मुंबईत खेळवले जाऊ शकतात. जर इंग्लंड भारत दौऱ्यावर येऊ शकतो, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टूर्नामेंट विविध ठिकाणी होऊ शकते, तर आयपीएल भारतातच खेळवण्यास काय हरकत आहे? त्यामुळे माझ्या मते हे सामने येथेच खेळवले जातील.
यासंबंधात बीसीसीआय आणि आयपीएलचे अधिकारी चर्चा करत असून लीग मॅचेस आणि प्लेऑफ दोन वेगवेगळ्या ठिकाणी घ्यावे, असे त्यांचे मत आहे. लीग मॅचेससाठी मुंबईचा विचार होऊ शकतो, कारण, येथे तीन आंतरराष्ट्रीय स्टेडियम्स आहेत. येथे सरावासाठी देखील सर्व सुविधा आहेत. तर अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये नॉकआऊटचे सामने खेळवले जाऊ शकतात. मात्र, हे सगळे चर्चेच्या प्राथमिक पातळीवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अन्य संघांच्या काही प्रमुख खेळाडूंनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सनरायझर्स हैदराबादचे मेंटॉर व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सांगितले की, सामने कुठे खेळवले जाणार, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य कार्यकारी वेंकी मैसूर यांचे म्हणणे आहे की, सगळे संघ कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असल्याचे दिसते आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचे संकट तीव्र असतानाही आयपीएलचे उत्तम आयोजन करण्यात आले होते. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी आयपीएल कुठे खेळवले जाईल याबाबत काही सांगितले नसले तरी भारतातच हे सामने व्हावेत, असे विधान यापूर्वीच केले आहे.