नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या 15 व्या सत्रासाठी मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआय पुढील हंगामाच्या अंतिम टप्प्यात येत्या मे महिन्यात दोन नवीन संघांचा लिलाव जाहीर करणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 संघ सहभागी होत आहेत.
या वर्षाच्या सुरूवातीला आयपीएलच्या सुकाणू समितीने मंजूर केलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांवर विचार करण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांच्यासह मंडळाच्या उच्च अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यानुसार मे महिन्याच्या अखेरीस आयपीएलला दोन नवीन संघ मिळू शकतात. लोकप्रिय अशा टी -20 लीगमध्ये सध्या आठ संघ आहेत, परंतु 2022 हंगामात दहा संघ असतील.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुढच्या वर्षापासून आयपीएलमध्ये 10 संघ असतील आणि यावर्षी मे महिन्यापर्यंत नवीन फ्रँचायझीसाठी निविदा प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील विविध गोष्टी निश्चित केल्या जातील. संघ निश्चित झाल्यानंतर सराव करण्यास बराच वेळ लागतो. गुजरात संघाने आधीच आयपीएल खेळल्यामुळे अहमदाबादमधील एखादा संघ येऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, रविवारी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली जाईल आणि कोणत्याही वरिष्ठ खेळाडूला विश्रांती दिली जाणार नाही, अशी अपेक्षा आहे. तसेच पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिकक्कल यांना संघात स्थान मिळणार नाही. त्याचबरोबर भारतीय महिला संघ पुढच्या वर्षी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. गतवर्षी या संघाने कोणताही आंतरराष्ट्रीय दौरा केला नाही.