मुंबई – प्राप्तिकर विभागाने ठाणे जिल्ह्यामधील मीरा- भाईंदर भागामध्ये प्रमुख बांधकाम व्यावसायिकांशी संबंधित प्रकरणी छापे घातले. यावेळी केलेल्या कारवाईत तब्बल १० कोटी १६ लाख रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच शोध मोहिमेदरम्यान जप्त केलेल्या रोख रकमेसहित यापूर्वीच्या वर्षांचे एकूण ५२० कोटी ५६ लाख रुपयांचे बेहिशोबी उत्पन्न आढळले.
जमीन आणि सदनिकांच्या विक्रीद्वारे मिळालेले हे उत्पन्न होते, तसेच बनावट कंपन्यांच्या नावाने विनातारण अवैध कर्जांच्या, प्रारंभिक भांडवल/ कर्जाऊ रोख रक्कम, बेहिशोबी खर्चासाठी रोख रक्कम आदिंच्या स्वरुपात बेहिशोबी रोख रक्कम मिळाल्याच्या नोंदी आढळल्या. त्याशिवाय २०१९-२० या आर्थिक वर्षात या समूहाने ५१४ कोटी ८४ लाख कोटी रुपयांचा बेहिशोबी विक्री महसूल प्राप्त केल्याचे देखील तपासादरम्यान आढळले. त्यानुसार या समूहाने यासाठी स्वयं मूल्यांकन कर भरण्याची तयारी दर्शवली आहे. या शोध मोहिमे दरम्यान सापडलेल्या लॉकर्सची तपासणी अद्याप बाकी असून पुढील तपास सुरू आहे.