नाशिक – ‘आयएमएद्वारा आयुर्वेदिक औषधींना प्लॅसिबो म्हणणे आणि भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाद्वारा कोविड -१९ वैश्विक संकटामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचा प्रोटोकॉल जाहीर करण्याला अवैज्ञानिक आणि असंवैधानिक म्हणणे हे अत्यंत निंदनीय’ असल्याचे आयुर्वेदिक डॉक्टरांची संघटना असलेल्या एन्. आय. एम्. ए.(N.I.M.A) ने म्हटले आहे. आयएमएची ही बाब स्वतःचा मोठेपणा मिरविण्यासारखी आहे. याचा निमा संघटनेकडून जाहीर निषेध करीत असल्याचे निमा नाशिकच्या अध्यक्ष डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
निमा संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जगातील सर्वात प्राचीन चिकित्सा पद्धती आयुर्वेद, ज्या शास्त्राच्या माध्यमातून ” स्वस्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम् ” या उद्देशानुसार जीवनातील सुखायु आणि दीर्घायु प्राप्त करण्यासाठी देशातील गरीब जनता तसेच साधन संपन्न, शहरी, उच्चपदस्थ, शीर्षस्थ वर्ग विशेष पर्यंत आयुर्वेदाची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. सद्य परिस्थितीतील वैश्विक महामारी कोविड -19 च्या सुनामीला देशामध्ये नियंत्रित करण्यासाठी भारतीय चिकित्सा पद्धती अर्थात आयुर्वेदाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ज्याची सप्रमाण नोंद देशभरात घेतली गेली आहे. आयुर्वेदाविषयी ज्ञान नसलेल्या व्यक्तीच्या वक्तव्यावरुन आयुर्वेद हे असायंटिफिक शास्त्र असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही. देशाची गौरवपूर्ण चिकीत्सापद्धती आयुर्वेदाने राष्ट्रीय आरोग्य संकटात महत्वपूर्ण आणि यशस्वी भूमिका बजावल्यानंतर आणि ते सप्रमाण सिद्ध झाल्यानंतर इतर कुठल्याही संघटनेद्वारा कुठल्याही प्रमाणपत्राची गरज उरत नाही. आयुर्वेद हे शास्त्र म्हणून स्वयंसिद्ध आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने देशातील जनसामान्यांच्या जीवनपद्धतीला अनुकूल अशी आहार-विहार पद्धती तसेच आयुष काढा व आयुष गाईडलाईन्स यांचा वापर करण्यासाठी प्रेरित आणि संबोधित केले. त्यामुळे जनसामान्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊन रोगाविरुद्ध लढण्याची शक्ती वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे देशातील कोविड -19 या वैश्विक महामारीची तीव्रता खूप कमी झाली. देशातील कोविड -19 आजाराने संक्रमित रुग्णांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेद्वारा अंदाजीत संख्येपेक्षा खूप कमी राहिली. तसेच त्याची तीव्रता सुद्धा तुलनेने कमी राहिली. यावरून स्पष्ट होते की आयुर्वेदिक औषधी द्वारा जनसामान्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत.
देशातील विविध संशोधन संस्था द्वारा प्रकाशित रिपोर्ट, भारतातील जनसामान्या मधील सर्वेक्षण, विविध मीडिया सर्वेक्षण, विविध वर्तमानपत्रे आणि मासिकांमधील प्रकाशित लेख, माहिती इत्यादी द्वारा हे वारंवार सिद्ध झाले आहे की कोविड -19 जागतिक महामारीच्या नियंत्रणामध्ये भारतीय चिकित्सा पद्धती आयुर्वेद आणि योग यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
आयुर्वेद औषधी उपयोगामुळे आलेले चांगले परिणाम, त्या परिणामांचे समर्थन आणि संपूर्ण समाधान झाल्यानंतर भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने कोविड -19 या वैश्विक महामारीच्या रुग्णांमध्ये आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा उपयोग, त्याची संमती आणि त्याबद्दलचा प्रोटोकॉल जाहीर केला. जे भारतीय जनतेच्या स्वास्थ्य रक्षणासाठी तसेच उपचारासाठी एक अनुकूल, प्रशंसनीय आणि योग्य पाऊल म्हणता येईल. त्यामुळे एक राष्ट्रीय आणि जबाबदार संघटना म्हणून निमा द्वारा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य मंत्री मा. डॉ हर्षवर्धन, आयुष्य मंत्री श्रीपादजी नाईक यांचे, जनसामान्यांच्या जीवन रक्षणासाठी आयुर्वेदाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन तसेच देशाच्या हितामध्ये उपयोगी चिकित्सापद्धती म्हणून आयुर्वेद चिकित्सा पद्धतीचा वापर करण्याबद्दलच्या या अभिनंदनीय प्रयत्नाबद्दल त्यांची वारंवार प्रशंसा आणि आभार व्यक्त करत आहे.
देशातील सर्व चिकित्सा पद्धतीवर एकाधिकारशाही असल्या सारखे वागणारी एक संघटना निष्करण मनात विद्वेषाची भावना ठेवून देशाची गौरवपूर्ण चिकित्सा पद्धती आयुर्वेदाला विकासापासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसते. आयुर्वेद ही एक संपूर्ण चिकीत्सापद्धती आहे. जीवन पद्धती आहे, फक्त लक्षणानुसार चिकित्सा किंवा फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून नाही.
आयएमएद्वारा आयुर्वेदिक औषधींना प्लॅसिबो म्हणणे आणि भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालय द्वारा कोविड -19 वैश्विक संकटामध्ये आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीचा प्रोटोकॉल जाहीर करण्याला अवैज्ञानिक आणि असंवैधानिक म्हणणे हे अत्यंत निंदनीय असून, स्वतःचा मोठेपणा मिरविण्यासारखे आहे. याचा जाहीर निषेध आमची राष्ट्रीय संघटना एन्. आय. एम्. ए.(N.I.M.A) अत्यंत प्रखर शब्दांमध्ये करीत आहे, असे NIMA नाशिक शाखेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री सूर्यवंशी, सचिव डॉ. वैभव दातरंगे, कोषाध्यक्ष डॉ. प्रतिभा वाघ, निमा कॆद्रिय शाखेचे सहकोषाध्यक्ष डॉ. शैलेश निकम, केंद्रिय वेब कन्व्हेनर डॉ. मनीष जोशी, निमा महाराष्ढ्र शाखेचे खजीनदार डॉ. भुषण वाणी, उपसचिव डॉ. अनिल निकम, प्रवक्ता डॉ. तुषार सूर्यवंशी, महाराष्ट्र शाखा वेबकन्व्हेनर डॉ. देवेंद्र बच्छाव, डॉ. राहुल पगार, डॉ. मनीष हिरे, डॉ. ललील जाधव, डॉ. प्रसाद देशपांडे, डॉ. व्यंकटेश पाटील, डॉ. सुजीत सुराणा, डॉ. प्रणिता गुजराथी, डॉ. दिप्ती बढे यांचेद्वारे कळविण्यात येत आहे.