नाशिक – लंडन मधील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेकनॉलॉजि (आय. ई. टी.) ही अभियांत्रिकी क्षेत्रातील एक नामांकित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटना आहे. या वर्षामध्ये ही संघटना १५० वर्षे पूर्ण करणार आहे. भारतात बंगलोर येथे संघटनेचे मुख्य कार्यालय आहे. त्याव्यतिरिक्त अन्य सात ठिकाणी लोकल नेटवर्क आहेत. त्यापैकी नाशिक एक लोकल नेटवर्क आहे. नाशिकच्या कार्यक्षेत्रामध्ये नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद यांचा समावेश होतो. या संघटनेच्या माध्यमातून औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांना एकत्र घेऊन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे रोजगार व व्यावसायिक कौशल्ये वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. या अशा व्यावसायिक संघटनेच्या नाशिक लोकल नेटवर्क च्या अध्यक्षपदी कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेमधील विद्युत अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. रवींद्र मुंजे यांची निवड झाली आहे. ही निवड दोन वर्षांसाठी असते. प्रा. मुंजे यांच्या या निवडीबद्दल आय. ई. टी. नाशिक लोकल नेटवर्क चे माजी अध्यक्ष डॉ. कुशारे, के के वाघ अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. नांदुरकर, संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब वाघ व विश्वस्त श्री. समीर वाघ यांनी प्रा. डॉ. मुंजे यांचे अभिनंदन केले.