नाशिक – त्र्यंबकनाका ते अशोक स्तंभ या दरम्यान साकारण्यात आलेल्या स्मार्ट रोडविषयी प्रचंड तक्रारी येत असल्याने अखेर याची दखल नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने घेतली आहे. शहरातील पहिलाच स्मार्ट रोडचे बांधकाम सदोष असल्याच्या तक्रारी येत असल्याने आता आयआयटी, मुंबई या संस्थेची मदत घेण्यात आली आहे. म्हणून आयआयटी मुंबईचे पथक लवकरच १.१ किलोमीटर लांबीच्या या स्मार्ट रोडची पाहणी करणार आहे.
ऑक्टोबरच्या अखेरीस सदर पथक भेट देऊन सदर चुकांची दुरुस्ती करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्याविषयी या पथकाने आपले अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी शहरातील पहिला स्मार्ट रस्ता बांधकाम सदोष असल्याचे समजून या कारणांचा शोध घेण्याचे ठरविले आहे.
दरम्यान, यावर्षी जानेवारीत स्मार्ट सिटीच्या बोर्डाच्या बैठकीत एनएमएससीडीएलचे अध्यक्ष सीताराम कुंटे म्हणाले होते की, स्मार्ट रोडमधील राईडिंगची गुणवत्ता निर्धारित स्टँडरनुसार नाही. परंतु, रस्ते बांधकामांचे काम पूर्ण झाले असल्याने ही त्रुटी दूर करणे शक्य झाले नाही. म्हणूनच स्मार्ट सिटी मंडळाच्या बैठकीत तोडगा काढण्यासाठी आयआयटीच्या तज्ज्ञांच्या मदतीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी एनएमएससीडीसीएलला एक पत्र लिहिले होते, परंतु कोविड -१९ च्या संकटामुळे पथकाची भेट सुमारे सहा महिन्यापर्यंत लांबली. अखेर आता एनएमएससीडीसीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस हा अहवाल सादर केला जाण्याची अपेक्षा आहे.