नाशिक- इन्स्टिटयूट ऑफ इंडियन इंटिरियर डिज़ाइनर्स (आयआयआयडी ) नाशिक शाखेच्या वतीने मार्च महिन्यात “डिजाईन कन्फ्लुएन्स अँड शोकेस ” हे देशपातळी वरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून , या माध्यमातून नाशिक मधील टॅलेंट , पायाभूत सुविधा आणि वास्तूवैभव देशभर पोहचविण्याचा मानस असल्याचे इन्स्टिटयूट ऑफ इंडियन इंटिरियर डिज़ाइनर्स नाशिक शाखेच्या अध्यक्षा तरन्नुम काद्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आकार इन्फोमीडिया अहमदाबाद यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन होत आहे
महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील वेगवान बदलाचे शहर म्हणून नाशिककडे बघितले जात आहे. तसेच भारत सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात नाशिकचा समावेश असल्याने नाशिककडे वेगळी बाजारपेठ म्हणून बघितले जाऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर इन्स्टिटयूट ऑफ इंडियन इंटिरियर डिज़ाइनर्स नाशिक शाखेतर्फे हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
या प्रदर्शनात देशभरातील नामांकित वास्तुविशारद आणि अंतर्गत सजावटकार (आर्किटेक्ट आणि इंटेरिअर डिज़ाइनर्स ) सहभागी होतील. जेष्ठ आणि अनुभविंचे मार्गदर्शन, विविध विषयांवरील सादरीकरण, समूह चर्चा याबरोबरच अंतर्गत सजावटी संदर्भातील अत्याधुनिक उत्पादनांचे व डिझाइन्स चे प्रदर्शन हे खास आकर्षण असणार आहे.
१९ ते २१ मार्च असे तीन दिवस हे प्रदर्शन गोविंदनगर येथील मनोहर गार्डन या ठिकाणी होणार आहे. हे प्रदर्शन आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स, रियल्टर्स, बांधकाम सेवा पुरवठादार, विद्यार्थी यांच्या बरोबरच सामान्य माणसांनासुद्धा उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल. आयआयआयडीच्या देशभरातील सुमारे ३३ शाखांचे तसेच संस्थेचे देशपातळीवरील पदाधिकारी यात सहभागी होतील. नाशिकमधील या संदर्भातील व्यावसायिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पत्रकार परिषदेस सचिव अतुल बोहरा, आकार इन्फोमीडियाचे कमल आणि अक्षत कोखाणी , राकेश लोया, शीतल साखला, आकाश कदम, हकीम सिन्नरवाला, वैशाली प्रधान, हेमंत दुगड, सचिन गांग आदी उपस्थित होते .