मुंबई – तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या बरोबर गैरवर्तन केल्या प्रकरणात १२ विरोधी पक्षातील आमदारांना एक वर्षासाठी निलंबन करण्यात आल्यानंतर या आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदन दिले. निवेदन देतांना निलंबित झालेले आशिष शेलार, गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार (बंठी) भांगडिया या आमदारांचा समावेश होता.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले की, जे घडले नाही त्याचे भूत उभे करुन षडयंत्र रचले गेले. त्याचे सत्यकथन राज्यपालांकडे केले.ज्या आरोपावर निलंबन केले त्याचा अहवाल राज्यपालांनी मागवावा अशी विनंती केली आहे. जवळपास ३५ मिनिटांची भेट झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपालांनी कायदेशीर प्रक्रिया करुन उचित निर्णय घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी शेलार म्हणाले की, सभागृहात व दालनातही कोणत्याही भाजपच्या एकाही आमदाराने अपशब्द वापरला नाही. जी व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल मंत्री करतात त्यात बघितले तर त्यात लक्षात येईल. त्यात कोणते गैरवर्तन केलेले दिसत नाही. केवळ असत्य गोष्ट रचून लोकशाहीची प्रेतयात्रा काढली आहे. या मुस्कटदाबीला आम्ही घाबरणार नाही. यावेळी त्यांनी १२ चा आकडा करण्यासाठी एक तास महाविकास आघाडीने घेतला. यातील काही सदस्यांचा समावेश नव्हता तरी त्यांच्यावर कारवाई केली आहे.
राज्यपालांचे अधिकार
निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली असली तरी विधानसभेच्या कारवाईवर राज्यपालांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का ? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. याबाबत कायदेतज्ञांनी मते व्यक्त केली आहे. सभागृहाच्या कामकाजात राज्यपाल हस्तक्षेप करु शकत नसल्याचे काहींनी मत व्यक्त केले आहे.