मुंबई – राज्यातील सर्व आमदारांसाठी आनंदाची बातमी आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधीमंडळात मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळे आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्यात आली होती. मात्र, आता हे वेतन १०० टक्के मिळणार आहे. याची अंमलबजावणी १ मार्चपासून होणार आहे. तसे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना संकटाचा परिणाम विविध क्षेत्रांवर झाला. राज्य सरकारचा महसूलही घटला. त्याची दखल घेत राज्य सरकारने राज्यातील सर्व आमदारांच्या वेतनातून ३० टक्के कपात केली होती. एप्रिल २०२० ते एप्रिल २०२१ या काळात ही कपात राहिल, असे सरकारने स्पष्ट केले होते.
किती असतो पगार
राज्यातील आमदारांचा पगार हा प्रति महिना २ लाख ३२ हजार रुपये एवढा आहे. या पगारातून व्यवसाय आणि आयकर कापला जातो. उर्वरीत रक्कम आमदारांना मिळते. प्रत्येक आमदारांचे उत्पन्न वेगवेगळे असते. ३० टक्के कपातीमुळे आमदारांना १ लाख ६२ हजार रुपयाच्या आसपास वेतन होते. यातून कराची रक्कम कपात होत होती. मात्र, आता पवार यांच्या घोषणेमुळे आमदारांना १ मार्चपासून १०० टक्के वेतन मिळणार आहे.